Samantha Ruth Prabhu-Raj Nidimoru : प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू व नागा चैतन्य या दोघांचाही घटस्फोट मनोरंजन विश्वातील सर्वाधिक चर्चेतला विषय राहिला. नागा चैतन्य घटस्फोटानंतर आयुष्यात पुढे गेला आहे, त्याने दुसरं लग्न केलं आहे. आता समांथाही वैयक्तिक आयुष्यात पुढे जात असल्याचं तिच्या पोस्टवरून दिसत आहे.

समांथाने नुकतेच काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यानंतर तिच्या नात्याच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. समांथा रूथ प्रभू निर्माती म्हणून तिचा पहिला चित्रपट ‘शुभम’ च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. ती सोशल मीडियावर शूटिंग व विविध इव्हेंटचे फोटो शेअर करत असते. समांथाच्या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत तयार झालेला हा चित्रपट उद्या म्हणजेच ९ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. समांथाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये क्रू आणि दिग्दर्शक राज निदिमोरू यांच्याबरोबरच्या काही फोटोंचा समावेश आहे. या फोटोंमुळे राज व समांथा डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

समांथा रूथ प्रभू व दिग्दर्शक राज निदिमोरू रिलेशनशिपमध्ये आहेत, असं मह्टलं जातंय. बुधवारी समांथाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. यात समांथाच्या लाडक्या श्वानाबरोबर राजचा एक फोटो आहे. तर एका सेल्फीत समांथा व राज एकत्र दिसत आहेत.

समांथाच्या पोस्टचे कॅप्शन

समांथने ‘नवी सुरुवात’ असं म्हणत हे फोटो पोस्ट केले आहेत. “हा एक मोठा प्रवास होता आणि आता आम्ही इथे आहोत. नवीन सुरुवात. शुभम ९ मे रोजी प्रदर्शित होईल,” असं समांथाने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

राज अँड डीकेमधील राज निदिमोरू विवाहित आहे. समांथा व राज दोघेही याआधी पिकलबॉल टीम चेन्नई सुपर चॅम्प्समध्ये एकत्र दिसले होते. तेव्हापासून त्यांच्या नात्याबद्दल चर्चा होत आहेत. मात्र, अद्याप समांथा व राज यांनी याबद्दल काहीच प्रतिक्रिया दिलेल्या नाहीत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समांथाने अभिनेता नागा चैतन्यशी लग्न केलं होतं. दोघांनी २०१७ मध्ये गोव्यात एका भव्य सोहळ्यात लग्नागाठ बांधली, पण ४ वर्षांत त्यांचा संसार मोडला. २०२१ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर ३ वर्षांनी नागा चैतन्यने २०२४ मध्ये सोभिता धुलीपालाशी दुसरं लग्न केलं. आता समांथाच्या नात्याबद्दल चर्चा सुरू आहेत. समांथा राज निदिमोरूला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. राज निदिमोरूचं लग्न श्यामली डे हिच्याशी झालं असून या जोडप्याला एक मुलगी आहे.