San Rechal Death: प्रसिद्ध मॉडेल व सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सॅन रेचेल गांधी हिने आत्महत्या केली. सॅन रेचेल २६ वर्षांची होती. तिने पुद्दुचेरीमध्ये आयुष्य संपवलं. रंगभेदाबद्दल आंतरराष्ट्रीय मंचावरून बोलणाऱ्या सॅन रेचेलने आर्थिक संकटातून हे धक्कादायक पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कोण होती सेन रेचेल? ते जाणून घेऊयात.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, २६ वर्षीय सॅन रेचेलचे नुकतेच लग्न झाले होते. ती पुद्दुचेरीमधील करमणिकुप्पम येथे राहत होती. ती नैराश्यात होती, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. ५ जुलै रोजी तिने जाणीवपूर्वक मोठ्या प्रमाणात झोपेच्या गोळ्या घेतल्या होत्या. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डिस्चार्ज मिळण्यापूर्वीच ती रुग्णालयातून निघून गेली होती.

नंतर काही दिवसांनी तिची प्रकृती बिघडली आणि तिला मूलकुलम येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मग डॉक्टरांनी तिला जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (JIPMER) येथे रेफर केलं. तिथे उपचारादरम्यान १२ जुलै रोजी तिचे निधन झाले. मृतदेहाचे पोस्टमार्टम आज १४ जुलै रोजी केले जाणार आहे.

पोलिसांना रेचेलने लिहिलेली एक चिठ्ठी सापडली आहे. त्यात तिने तिच्या मृत्यूसाठी कोणीही जबाबदार नसल्याचं लिहिलं आहे. सॅन रेचेलचं नुकतंच लग्न झालं होतं. वैवाहिक आयुष्यातील समस्यांमुळे तिने आत्महत्येसारखं धक्कादायक पाऊल उचललं तर नाही ना, याचा तपास पोलीस करत आहेत.

एनडीटीव्हीने पोलीस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, सॅन रेचेल आर्थिक अडचणीत होती. तिने कामासाठी पैसे गोळा करण्यासाठी तिचे दागिने गहाण ठेवले होते. तिला तिच्या वडिलांकडून आर्थिक मदतीची अपेक्षा होती. पण त्यांनी मदत करू शकत नसल्याचं म्हटलं होतं. तिला किडनीशी संबंधित समस्या होत्या, अशी माहितीही समोर आली आहे.

कोण होती सॅन रेचेल गांधी?

सॅन रेचेल ही सॅन रेचेल गांधी आणि शंकरप्रिया म्हणूनही ओळखली जायची. ती मूळची पुद्दुचेरी येथील रहिवासी होती. सॅन रेचेल एक लोकप्रिय मॉडेल, मॉडेलिंग प्रशिक्षक, म्हणजेच ‘रनवे कोच’ होती. सॅन रेचेलने २०१९ मध्ये ‘मिस डार्क क्वीन तमिळनाडू’ हा किताब जिंकून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आणि नंतर ‘मिस पाँडिचेरी २०२२’चा किताब जिंकला होता. रेचेल लहान असतानाच तिच्या आईचे निधन झाले. तिने लंडन, जर्मनी आणि फ्रान्समधील अनेक आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेतला होता आणि ती अनेक सौंदर्यस्पर्धा जिंकली होती. तिने ‘मिस आफ्रिका गोल्डन वर्ल्ड २०२३’ या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्त्व करून ‘फर्स्ट रनर अप’चं स्थान मिळवलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काळी मुलगी कधी सुंदर असूच शकत नाही का? सॅन रेचेल

सॅन रेचेलला लहानपणापासून त्वचेच्या रंगावरून बरेच टोमणे ऐकावे लागले होते. तिची त्वचा गडद काळी असल्यानं लहानपणी मुलं तिला आपल्यात सामावून घ्यायची नाहीत, तिला हिणवलं जायचं. गोरं होण्यासाठी तिने खूप सौंदर्यप्रसाधनं वापरून पाहिली. “एका क्षणी मला असं जाणवलं, की त्वचेच्या रंगापेक्षा माणसाचं वागणं, त्यांच्या इतरांशी वागतानाचा ॲटिट्युड, हे अधिक महत्त्वाचं आहे. यातून आत्मविश्वास मिळाला. सगळ्या चित्रपटांमध्ये गोऱ्याच नायिका दाखवलेल्या असायच्या, तेव्हा मला वाटायचं, की काळी मुलगी कधी सुंदर असूच शकत नाही का? पण समाज आपल्या मनावर हेच बिंबवतो. मॉडेलिंग सुरू केलं, तेव्हा माझ्या रंगामुळे मला खूप असुरक्षित वाटे, पण हळूहळू तसं वाटेनासं झालं. काळ्या रंगाकडे फक्त गोऱ्या रंगासारखाच एक रंग म्हणून बघायला हवं. सौंदर्याची पातळी ठरवण्यासाठीचा तो मापदंड नसावा,” असं सॅन रेचेल एका मुलाखतीत म्हणाली होती.