scorecardresearch

‘बिग बॉस मराठी ३मध्ये सहभागी होणार या अफवांमुळे मला काम मिळत नाही’, अभिनेत्याचा खुलासा

‘बिग बॉस मराठी ३’ चा ग्रॅंड प्रिमियर १९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

sangram samel, bigg boss marathi 3,
'बिग बॉस मराठी ३' चा ग्रॅंड प्रिमियर १९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ हा शो वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो आहे. प्रेक्षक इतर मालिकांसोबतच ‘बिग बॉस’ पाहायला पंसती देतात. फक्त हिंदी ‘बिग बॉस’ नाही तर त्यासोबत ‘बिग बॉस मराठी’ची लोकप्रियताही कमी नाही. आता ‘बिग बॉस मराठी’चे ३ पर्व लवकरच सुरु होणार आहे. लोकप्रिय अभिनेता संग्राम समेळ हा ‘बिग बॉस मराठी’चा भाग होणार अशा चर्चा सुरु आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत संग्रामने त्याच्या ‘बिग बॉस मराठी ३’मध्ये जाण्याविषयी आणि या सगळ्या गोष्टींचा काय परिणाम होत आहे ते सांगितले आहे.

संग्रामने नुकतीच ‘ईटाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत या सगळ्या चर्चांविषयी संग्रामने स्पष्टीकरण दिले आहे. “मी ‘बिग बॉस मराठी ३’मध्ये सहभागी होणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या आहेत. परंतु या सगळ्या अफवा आहेत. मी या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी होत नाहीये. जेव्हा पासून या कार्यक्रमाची घोषणा झाली तेव्हा पासून सातत्याने मला फोनद्वारे याबाबत विचारणा होत आहे. इतकेच नाही तर काही लोकांनी तर ‘बिग बॉस मराठी ३’ या शोमधील अंतीम स्पर्धकांच्या यादीमध्ये माझ्या नावाचा समावेशही करून टाकला आहे,” असे संग्राम म्हणाला.

आणखी वाचा : तुझ्या घराचा रंग पावसाच्या पाण्याने उडाला म्हणणाऱ्यांना हृतिकचं भन्नाट उत्तर, म्हणाला…

पुढे या सगळ्यांचा परिणाम त्याच्या कामावर होत असल्याचे म्हणतं संग्राम म्हणाला, “या सगळ्या अफवांमुळे मला काम आणि नवीन प्रोजेक्ट्स मिळणे बंद झाले आहे. लोकांना वाटते की मी ‘बिग बॉस मराठी ३’च्या घरात जात आहे.”

आणखी वाचा : समांथा आणि नागा चैतन्य खरंच विभक्त होणार? समोर आली भविष्यवाणी

लवकरच, ‘बिग बॉस मराठी ३’चा ग्रॅंड प्रिमियर येत्या रविवारी १९ सप्टेंबर रोजी होणार आहे. हा शो आपल्याला कलर्स मराठीवर रात्री ९.३० वाजता पाहायला मिळणार आहे. तर या आधीच हा शो आपल्याला वूट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळेल. ‘बिग बॉस मराठी ३’ चे सुत्रसंचालन महेश मांजरेकर करत आहेत. गेल्या वर्षी करोनाच्या संकटामुळे ‘बिग बॉस मराठी’ आपल्याला पाहायला मिळाला नाही. यंदा एका वर्षानंतर ‘बिग बॉस मराठी’च्या घरात काय नवीन आणि वेगळं पाहायला मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-09-2021 at 12:55 IST