अभिनेता संजय दत्तने आपल्या होम प्रॉडक्शन बॅनरचा मुहूर्त केला, चित्रपट ठरवला, त्याची घोषणा केली आणि आता काम सुरू होईल म्हणता म्हणता त्याला शिक्षा सुनावली गेली. संजय दत्त तुरूंगात गेल्यानंतर संजय दत्त होम प्रॉडक्शनची धुरा त्याची पत्नी मान्यता दत्त हिने आपल्या खांद्यावर घेतली होती. मात्र, मान्यताला या निर्मितीसंस्थेचे काम पेलवत नसून ‘हसमुख पिघल गया’ हा त्यांचा पहिलाच चित्रपट डब्यात जाणार असे वृत्त आले होते. त्यावर या चित्रपटाचे काम सुरू असून ‘संजय दत्त होम प्रॉडक्शन’ही व्यवस्थित सुरू असल्याचा खुलासा संजयच्या वतीने देण्यात आला आहे.
संजय दत्त होम प्रॉडक्शन अंतर्गत ‘हसमुख पिघल गया’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार असून अमिताभ बच्चन या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. मात्र, संजय दत्त तुरूंगात गेल्यापासून चित्रपटाचे काम रखडले आहे. शिवाय, प्रॉडक्शनकडून दुसऱ्या कुठल्याही अन्य चित्रपट वा प्रकल्पाची घोषणा झाली नसल्याने सध्या तिथे कुठलेच काम नाही. म्हणून या प्रॉडक्शन कंपनीतील लोकांना काम सोडून जाण्याविषयी सुचवण्यात आल्याचे वृत्त प्रसिध्द झाले होते. मात्र, कंपनीविषयीचे हे वृत्त साफ खोटे आणि चुकीचे असल्याचे संजय दत्त प्रॉडक्शनच्या वतीने देण्यात आलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
‘हसमुख पिघल गया’ चित्रपटाचे चित्रिकरण ठरवल्याप्रमाणे वेळेत सुरू आहे. या चित्रपटाचे कथानक मोठय़ा प्रमाणावर उन्हाळ्यातील दिवसांवर केंद्रित आहे. चित्रपटाचा नायक (कुठल्यातरी कारणाने) भर उन्हात कसा घाम गाळत असतो हे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे तार्किकदृष्टय़ा हा चित्रपट उन्हाळ्यातच प्रदर्शित करणे योग्य असल्याने २०१५ च्या उन्हाळी सुट्टयांमध्ये तो प्रदर्शित करण्यात येणार आहे, असे या निवदेनात म्हटले आहे. आमची कंपनी बंद होत असल्याचे किंवा लोकांना काम सोडून जाण्याविषयी सांगितल्याचे वृत्त खोटे आहे, असे संजय दत्त प्रॉडक्शनच्या मुख्य अधिकारी दिप्ती जिंदाल यांनी म्हटले आहे. आमचे सगळया चित्रपटांचे काम वेळेत सुरू आहे. ‘हसमुख पिघल गया’ २०१५ च्या उन्हाळ्यात प्रदर्शित होईल, राजकुमार हिरानीचा चित्रपटाचेही पटकथेवर काम सुरू आहे. शिवाय, आणखी एका चित्रपटासाठी दिग्दर्शक म्हणून प्रभुदेवाच्या हातात सुत्रे सोपवण्यात आली असल्याची माहिती जिंदाल यांनी या निवेदनात दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay dutt home production run very well
First published on: 07-08-2014 at 06:39 IST