संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या आगामी चित्रपटाच्या सेटवर एक वेगळाच प्रकार घडला. जयपूर येथे या चित्रपटाच्या सेटवर करणी सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी चित्रिकरणादरम्यान गोंधळाचे वातावरण निर्माण केले होते. राणी पद्मावतीच्या व्यक्तिरेखेचे चित्रण चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्यामुळे हा विरोध करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या चित्रपटामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण, राणी पद्मावतीच्या भूमिकेत झळकणार आहे. सध्या या चित्रपटाच्या चित्रिकरणाला राजस्थान येथे सुरुवात झाली आहे.

सोशल मीडियावर सदर घटनेचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये राजपूत करणी सेनेचे कार्यकर्ते चित्रपटाच्या सेटवर चित्रिकरणाच्या सामानाची फेकाफेक करताना दिसत आहेत. तसेच, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आली. स्थानिक कार्यकर्त्यांच्या या हिंसक विरोधामुळे संजय लीला भन्साळी यांना पोलिसांची मदत घ्यावी लागली. जयगढ येथे घडलेल्या या सर्व प्रकारानंतर काही काळासाठी ‘पद्मावती’ या चित्रपटाचे चित्रिकरण थांबविण्यात आले होते. यापूर्वी, आशुतोष गोवारीकरच्या ‘जोधा-अकबर’ या चित्रपटाच्या चित्रिकरणाच्या वेळीही राजपूत करणी सेनेने सेटवर गोंधळ घातला होता. ‘जोधाने अकबरच्या मुलासोबत लग्न केले होते अकबरसोबत नाही’, असे म्हणत त्यावेळी ‘जोधा-अकबर’ या चित्रपटाला विरोध करण्यात आला होता. दरम्यान, राजपूत ही राजस्थानातील एक वरची जमात आहे. पारंपारिक विचारसरणी, ऐतिहासिक वारसा आणि संस्कृती जपण्याकडे राजपूतांचा जास्त कल असतो.

दरम्यान, आशुतोष गोवारीकर, राम गोपाल वर्मा, करण जोहर, श्रेया घोषाल यांच्यासह बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी संजय लीला भन्साळी यांच्यावरील हल्ल्याचा ट्विटरवरुन निषेध केला आहे. राजस्थान पोलीस कुठे होती. लज्जास्पद.. याविरोधात काय केले जातेय? अशी लोकशाही काय कामाची, असे ट्विट गायिका श्रेया घोषाल हिने केले आहे.