Sanju Rathod New Song Sundari : ‘नऊवारी साडी’, ‘गुलाबी साडी’, ‘काली बिंदी’पासून ते काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘शेकी’ ( Shaky ) गाण्यापर्यंत… संजू राठोडच्या सगळ्याच गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं आहे. संजूचं नवीन गाणं केव्हा प्रदर्शित होणार आणि सोशल मीडियावर केव्हा ट्रेंड होणार याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत असतात. आता ‘शेकी’ गाण्याच्या घवघवीत यशानंतर हा लोकप्रिय गायक नवीन गाणं घेऊन सर्वांच्या भेटीला आला आहे.
संजू राठोडने ११ सप्टेंबरला रात्री ९ वाजता त्याचं ‘सुंदरी’ गाणं युट्यूबवर प्रदर्शित केलं. या गाण्याला अवघ्या १० तासांत ३ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. याशिवाय हे गाणं एका दिवसातच युट्यूबवर टॉप-१५ गाण्यांमध्ये ट्रेंड होत आहे. यावरून संजूची क्रेझ तरुणाईमध्ये किती मोठ्या प्रमाणात आहे याचा अंदाज येतो. संजूचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. ‘शेकी’च्या यशानंतर त्याने ‘सुंदरी’ गाणं लॉन्च केलं आहे. या गाण्याला मराठीसह बंजारा भाषेचा टच असल्याचं पाहायला मिळत आहे.
संजूच्या प्रत्येक म्युझिक व्हिडीओमध्ये नवनवीन अभिनेत्रींना संधी दिली जाते. ‘सुंदरी’मध्ये लोकप्रिय इन्फ्लुएन्सर यशिका जातव झळकली आहे. ‘सुंदरी’ गाणं संजूने गायलं असून या गाण्याचा संगीतकार व गीतकार सुद्धा तो स्वत: आहे. नेहमीप्रमाणे या गाण्याची संगीत निर्मिती G-Spark ने केली आहे.
संजूचं हे ‘सुंदरी’ गाणं ३ मिनिटं १७ सेकंदांचं असून चाहत्यांना २ मिनिटं ५ सेकंदाला या गाण्यात एक खास सरप्राइज मिळतं. ते सरप्राइज म्हणजे बंजारा लिरिक्स…”टक टक देख रो सांवरिया” या बंजारा ओळी ‘सुंदरी’ गाण्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतात.
संजूच्या या नव्या गाण्यावर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “संजू २:०५ मिनिटाला कमाल केलीस”, “अजिबात अश्लीलता नाही सुंदर गाणं आपली संस्कृती जपण्याचा उत्तम प्रयत्न… गायक हवा तर असा”, “संजूचं नवीन गाणं पुन्हा एकदा ट्रेंड होणार”, “मराठी भाषेला तुझ्यामुळे जगभरात एक वेगळी ओळख मिळाली… सर्वत्र तुझी गाणी वाजवली जात आहेत” अशा असंख्य प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या म्युझिक व्हिडीओवर दिल्या आहेत.