Sankarshan Karhade Shared A Video : संकर्षण कऱ्हाडे हा मराठी इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. अभिनयासोबतच तो सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतो. तो नाटकाचे प्रयोग, प्रेक्षकांचा प्रतिसाद, आणि स्वतःच्या कविता याबद्दल नेहमी पोस्ट करत असतो. त्यामुळे संकर्षण नेहमीच प्रेक्षकांच्या संपर्कात राहतो. अलीकडेच संकर्षणने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्याने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
संकर्षणला नाटकाच्या प्रयोगाच्यादरम्यान दोन वयोवृद्ध आजी भेटायला आल्या होत्या. महत्त्वाचं म्हणजे त्या फक्त त्याला भेटण्यासाठी आल्या होत्या, नाटक पाहण्यासाठी नाही. संकर्षणने त्यांच्याशी गप्पा मारतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधून त्या आजी, “तुझ्या कविता खूप छान असतात, विशेषतः तुझी आईवरची कविता आम्हाला खूप आवडली.” असं म्हणताना दिसत आहेत.
संकर्षणने त्यांना नाटक पाहण्यासाठी थांबता का असं विचाल्यानतंर त्यांनी आम्हाला उशीर होईल असं सांगितलं. परंतु, तेव्हा त्यांच्यासह आलेल्या एका व्यक्तीने सांगितलं की, “आमचं एक वृद्धाश्रम आहे, तिथल्या या आजी आहेत”. पुढे त्या दोन आजींनी सांगितलं की, “आम्हाला केवळ तुला भेटायचं होतं, कधीपासून आमची इच्छा होती”.
संकर्षणने पुढे या दोन आजींना चहा वगैरे घेणार का असं विचारलं असता त्यांनी त्यालासुद्धा नाही म्हणत, “आम्हाला काही नको फक्त तुला भेटण्यासाठी म्हणून इथे आलो” असं सांगितलं. यामधून त्या संकर्षणला भेटण्यासाठी किती उत्सुक होत्या हे पाहायला मिळतं”.
संकर्षणने हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमधून म्हटलं आहे की, “आज पुण्यात “नियम व अटी लागू” प्रयोगाआधी दोन आज्ज्या आल्या, दोघीही वयाने ८० आसपास असतील. “मला वाटलं प्रयोगाला आल्या असतील. तर म्हणाल्या, “आम्ही वृद्धाश्रमात राहतो, आम्हाला वेळत परत गेलं पाहिजे आणि ३ तास आम्ही तब्येतीमुळे बसू शकत नाही, पण तुला फक्त भेटायला आलोय.” भरभरून बोलल्या, आशीर्वाद दिले आणि निघून गेल्या. फक्त भेटीसाठी ऑटो करून आल्या होत्या. मी मुद्दाम जाताना त्यांना माझ्या गाडीने पाठवलं, फार गोड वाटल.”