सैफ अली खानची मुलगी सारा अली खान तिच्या बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. सुरूवातीला करण जोहर त्याच्या प्रोडक्शन कंपनीमधून टायगर श्रॉफसोबत ‘स्टुडंट ऑफ दी इयर २’ या सिनेमातून तिला लाँच करणार असे म्हटले जात होते. पण, वास्तवात मात्र सारा आता सुशांतसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अभिषेक कपूरच्या ‘केदारनाथ’ या सिनेमासाठी त्याने या जोडीला एकत्र आणले आहे. एवढंच काय तर रविवारी अभिषेक, सुशांत आणि सारा यांना एकत्र पाहण्यात आले. आपल्या आगामी सिनेमासंदर्भात बोलणी करण्यासाठी हे त्रिकूट भेटले असल्याचे म्हटले जात आहे.

पण साराबरोबर पहिला सिनेमा करण्यासाठी टायगर निश्चित झाला असतानाच मध्ये ‘केदारनाथ’ सिनेमा आला आणि सुशांतने बाजी मारली. पण तुम्हाला डॅशिंग टायगर की चॉकलेट बॉय सुशांत यांपैकी साराला कोणत्या अभिनेत्यासोबत साराला सिनेमात बघायला आवडलं असतं हे मात्र आम्हाला नक्की सांगा.

रविवारी सारा आणि सुशांत डिनर डेटला गेले होते. यावेळी या दोघांना एकत्र पाहून ऑनस्क्रिन त्यांची जोडी चांगली दिसेल असा अंदाज बांधला जात आहे. सध्या सुशांत त्याचा आगामी राबता सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ९ जूनला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. या सिनेमात दोन काळ दाखवण्यात आले आहेत. यात राजकुमार रावने चक्क ३६५ वर्षीय म्हाताऱ्याची भूमिका साकारली आहे.

दरम्यान सारा आणि अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूर यांचे नाव अनेकदा जोडले गेले आहे. सारा आणि हर्ष गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. हे दोघंही सध्या एकमेकांची साथ चांगलीच एन्जॉय करत आहेत. त्या दोघांचे मित्र त्यांच्यासाठी जरी खूश असले तरी सध्या हर्ष आता मॉडेल एलेना फर्नांडिसला थोडं झुकतं माप देत असल्याच्या बातम्या सिनेवर्तुळातून येत आहेत.