कला विश्वात लग्नसराईचे वारे वाहत असतानाच टेलिव्हिजन अभिनेता गौतम रोडे आणि त्याची प्रेयसी पंखुरी अवस्थी विवाहबंधनात अडकले आहेत. राजस्थानमध्ये एका दिमाखदार सोहळ्यात ते दोघंही विवाहबंधनात अडकले. काही मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. यावेळी पंखुरी आणि गौतम अगदी सुरेख दिसत होते.
सोशल मीडियावर बऱ्याच फॅन पेजेवरुन त्यांच्या लग्नातील काही व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. लग्नाच्या विधींसाठी गौतम आणि पंखुरीने पारंपरिक वेशभूषेला प्राधान्य दिले होते. गौतमने लग्नाच्या वेळी सोनेरी रंगाची शेरवानी घातली होती. तर पंखुरीने पारंपरिक असा लाल रंहाचा लेहंगा घातला होता. ज्यावर सोनेरी जरी आणि कुंदनने कलाकुसर करण्यात आली होती.
मोठ्या थाटात पार पडलेल्या या लग्नसोहळ्यामध्ये टेलिव्हिजन विश्वातील कोणताही चेहरा पाहायला मिळाला नाही. तेव्हा आता मुंबईत परतल्यानंतर हे नवविवाहित जोडपं त्यांच्या कलाकार मित्रमंडळींसाठी खास स्वागत समारंभाचं आयोजन करणार का हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पंखुरी हीसुद्धा अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. ‘स्टार’ वाहिनीवर प्रदर्शित झालेल्या ‘क्या कसूर है अमला का?’ या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ‘सूर्यपूत्र कर्ण’ या मालिकेच्या सेटवर गौतमसोबत तिची ओळख झाली. कालांतराने त्यांच्यातील मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. बराच काळ त्यांनी हे नाते सर्वांपासून लपवून ठेवले होते. पण, आता मात्र ते दोघंही या नात्याला एक वेगळी ओळख देण्यास तयार झाले असून, चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे.
VIDEO : ‘लल्लाटी भंडार’वर खिल्जी थिरकतो तेव्हा