या फोटोला पाहून तुम्हाला रामानंद सागर यांच्या सुप्रसिद्ध ‘कृष्णा’ या मालिकेची आठवण आली ना? ८० आणि ९० च्या दशकात ही मालिका खूप गाजली होती आणि यातील प्रत्येक भूमिकेने लोकांची मनं जिंकली होती. यातीलच कृष्णाची भूमिका साकारलेले अभिनेते सर्वदमन बॅनर्जी लोकप्रिय झाले होते. या लोकप्रियतेमुळेच त्यांना नंतर कित्येक मालिकांचे ऑफर्स मिळाले. ‘अर्जुन’, ‘जय गंगा मैया’ आणि ‘ओम नम: शिवाय’ यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी भूमिका साकारली. विशेष म्हणजे या सर्व मालिकांमध्ये सर्वदमन यांनी कृष्णाचीच भूमिका साकारली.

मोठ्या पडद्यावरही त्यांनी नशीब आजमावलं. ‘स्वामी विवेकानंद’, ‘स्वयं कृषी’, ‘आदि शंकराचार्य’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारली. मात्र त्यानंतर चित्रपटसृष्टीपासून ते दूर गेले. सर्वदमन बॅनर्जी सध्या काय कुठे आहेत आणि काय करत आहेत हे तुम्हाला माहित आहे का? त्यांच्या सध्याच्या कामगिरीबद्दल ऐकून तुम्हालाही त्यांचा अभिमान वाटेल.

सध्या सर्वदमन चित्रपट विश्वातील झगमगाटापासून दूर ऋषिकेशमध्ये आहेत आणि तेथे ते लोकांना ध्यानधारणा शिकवत आहेत. एका मुलाखतीत त्यांनी चित्रपटसृष्टी का सोडली याचे कारण सांगितले. ‘कृष्णा मालिकेत काम करतानाच मी ४५-४७ वयापर्यंतच अभिनय क्षेत्रात काम करण्याचा निर्णय केला होता. मागच्या २० वर्षांपासून मी ऋषिकेशमध्ये लोकांना ध्यानधारणा शिकवतोय,’ असं त्यांनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय ते ‘पंख’ नावाच्या स्वयंसेवी संस्थेसाठीही काम करत आहेत. उत्तराखंडमध्ये झोपड्यांमध्ये राहणाऱ्या मुलांच्या शिक्षणासाठी ही संस्था मदत करते. सर्वदमन यांची कामगिरी खरंच प्रशंसनीय आहे. अभिनय क्षेत्रात त्यांना जे सुख मिळालं नसेल ते त्यांना आता या कामातून नक्कीच मिळत असेल.