Marathi Actor Shares Bad Experience : देशभरात मोठ्या आनंदात आणि उत्साहात यंदाचा गणेशोत्सव पार पडला. गेले दहा दिवस लाडक्या बाप्पाची मनोभावे पूजा केल्यानंतर अनंत चतुर्दशीला या बाप्पाला निरोप देण्यात आला. अनंत चतुर्दशीला सर्वांनीच आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन केलं. सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणपतीचंही या दिवशी विसर्जन करण्यात आलं.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबई-पुणे सारख्या अनेक शहरांमध्ये डीजे आणि ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. अनेक ठिकाणी डीजेवर नागरिकांनी ठेका धरला होता. या डीजेमुळे पारंपरिक वाद्यांना बगल देण्यात आली. याचाच एक वाईट अनुभव अभिनेता सौरभ गोखलेने शेअर केला आहे.

सौरभ गोखले हा अभिनेता असण्याबरोबरच वादकही आहे. ढोल पथकात सौरभ वादन करतो. त्याचं कलावंत नावाचं ढोल पथकही आहे. अशातच त्याने पुण्यातील विसर्जन मिरवणुकीचा एक अनुभव शेअर केला आहे. या अनुभवाचा त्याने व्हिडीओ शेअर केला असून यात त्याने म्हटलं, “गणेश विसर्जनाच्या दिवशी आम्हाला एक अत्यंत वाईट अनुभव आला. मी कलावंत पथकाचा एक सदस्य आहे. आम्ही आज मार्केट यार्ड गणेश मंडळाबरोबर वादन करणार होतो.”

यानंतर तो म्हणतो, “संध्याकाळी सहा वाजताची आमची मिरवणूक होती. आम्ही बातम्यांमधून चांगली गोष्ट ऐकत होतो, ती म्हणजे लक्ष्मी रोडची मिरवणूक अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने चालली आहे. विसर्जन अत्यंत वेळेत होत आहेत. पण आम्हाला याउलट अनुभव आला. आमची सहाची मिरवणूक होती आणि वादनासाठी आम्ही तयारही होतो. मात्र, टिळक रोडला चाललेला डीजेचा धुमाकूळ आणि न सरकणारी मिरवणूक… याच्यापुढे सगळी मंडळं हतबल झाली होती.”

यानंतर अभिनेता म्हणाला, “मार्केट यार्ड मंडळदेखील अत्यंत हतबल झालं होतं. त्यांनी सर्वोतोपरी प्रयत्न केले. आम्हीही खूप वेळ वाट पाहिली. अखेरीस डीजेपुढे मंडळाला झुकावं लागलं. शिवाय आम्हालाही वादन न करण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्या कर्णकर्कश्य आवाजात रममाण झालेले लोक पाहून आम्ही वादन न करण्याचा निर्णय घेतला. कारण ते बघून असं वाटलं, इथे येणाऱ्या लोकांना पारंपरिक वाद्यांबद्दल फारसं प्रेम नाही. पण धुमाकुळ घालण्यात अधिक रस आहे. त्यामुळे आलेली गर्दी आणि, चाललेले नृत्य, तिथे वाजणारं संगीत ऐकून मनस्ताप झाला.”

सौरभ गोखले व्हिडीओ

यापुढे सौरभने सांगितलं, “हे सगळं लोकांसमोर यावं म्हणून हा व्हिडीओ करत आहे. बाकी काही नाही. त्यामुळे आम्ही आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांनी एक गजर केला. कारण ध्वज असाच उतरवायचो नसतो. ध्वजवंदन करत आम्ही या वादनाला पूर्णविराम दिला. याचा विचार करणं गरजेचं आहे. डीजेच्या धुमाकुळाला ब्रेक लागणं गरजेचं आहे. मला वाटतं आताही वेळ गेलेली नाही.”

यानंतर त्याने सर्वांना आवाहन करत “सर्वांनी विचार करा. आपण सगळेच पारंपरिक वाद्यांकडे वळूया. नाही तर काही वर्षांनी… वर्षांनीसुद्धा नव्हे; तर काही दिवसांनी परिस्थिती आणखी घातक होणार आहे आणि याचा वाईट परिणाम आपल्याला भोगावा लागणार आहे. विचार करा” असं म्हटलं.