संगीत क्षेत्रातील प्रत्येक कलाकारासाठी जागतिक संगीत दिन खास असतो. आज, २१ जून हा जागतिक संगीत दिन आहे. यानिमित्त गायिका सावनी रविंद्रने सोशल मीडियावरून नवी म्युझिकल सीरिज लाँच केली आहे.
जागतिक संगीत दिनाविषयी सावनी रविंद्रने सांगितलं की, “संगीत हा ज्यांचा श्वास आहे आणि संपूर्ण आयुष्य ज्यांनी संगीताला वाहिले आहे, त्या आमच्यासारख्या संगीत क्षेत्रातल्या सगळ्यांसाठी खरं तर रोजच संगीत दिन असतो.”
आपल्या सीरिजविषयी माहिती देताना ती म्हणाली, “आम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत संगीतच जगतो. पण जे संगीत क्षेत्रात नाहीयेत, त्यांच्याही आयुष्यात संगीताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संगीतप्रेमींसाठी हा दिवस खास व्हावा असं मला वाटतं. गायिका म्हणून माझं हे कर्तव्य आहे की, मी त्यांना स्वरमयी भेट द्यावी. त्यामुळे जागतिक संगीत दिनानिमित्त त्यांचा संपूर्ण आठवडाच मी संगीतमय करणार आहे. सध्या मी ही नवी सीरिज सुरू केली आहे. रोज एक व्हिडीओ मी सोशल मीडियावर अपलोड करतेय.”
ह्या सीरिजमध्ये जुन्या-नव्या, मराठी-हिंदी गाण्यांचा संगम आहे. सावनी म्हणते, “अभंग, रोमँटिक, पावसावरचे गाणे, अशा वेगवेगळ्या मुड्सच्या गाण्यांचा समावेश यात आहे. आजकाल लोकांना लाइव्ह आणि रॉ ऐकायला आवडतं. त्यामुळेच ह्याचं वैशिष्ट्य आहे की, या गाण्यांच्या शूटिंगदरम्यान कुठेही ब्रेक किंवा रिटेक घेतलेला नाही. ‘वन टेक जॅमिंग सेशन’ असा हॅशटॅगही मी वापरलाय.”
सावनीच्या या प्रयोगाला नेटकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद आहे.