आयपीएलचा मौसम रविवारी संपल्याने आता विविध वाहिन्यांवरील नवीन मालिकांना सुरुवात होणार आहे. सोनी एण्टरटेन्मेंट टेलिव्हिजनने हमखास प्रेक्षक मिळविण्यासाठी महाराणा प्रताप यांच्या जीवनावर ‘भारत का वीर पुत्र महाराणा प्रताप’ ही मालिका तयार केली असून सोमवारपासून गुरुवापर्यंत दररोज रात्री १० वाजता ही मालिका दाखविण्यात येईल. ऐतिहासिक आणि पौराणिक कथांवर आधारित कार्यक्रमांची वाहिनी लवकरच दाखल होणार असल्याने हमखास प्रेक्षकवर्ग मिळणाऱ्या ऐतिहासिक मालिकांमध्ये आघाडी घेण्याचा सोनी वाहिनीचा प्रयत्न आहे.
‘डान्स इंडिया डान्स लिट्ल मास्टर्स’ या नृत्य रिअ‍ॅलिटी शोच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता ठरलेला फैझल खान हा छोटय़ा महाराणा प्रताप म्हणून प्रथमच झळकणार आहे. तर अन्य महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आश्का गोराडिया, दिव्यलक्ष्मी, राजश्री ठाकूर, शक्ती आनंद हे कलावंत दिसतील.
सीआयडी ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून सोनी वाहिनीवर सुरू असून त्याचा म्हणून एक खास प्रेक्षकवर्ग सातत्याने ही मालिका पाहतो. आता आयपीएल क्रिकेटचा मौसम संपल्यानंतर अनेक वाहिन्या प्रेक्षकांना आपल्याकडे खेचण्यासाठी आणि पर्यायाने जीआरपी-टीआरपीचा आलेख कायम चढता ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. त्यासाठी नवनवीन मालिका वेळोवेळी वाहिन्यांकडून सादर केल्या जातात.
महाराणा प्रतापांचा पराक्रम, त्यांचे बालपणापासून ते पहिला स्वातंत्र्ययोद्धा बनण्यापर्यंतचा प्रवास आणि त्यांच्या जीवनातील रोमहर्षक प्रसंग प्रेक्षकांसमोर या मालिकेद्वारे आणले जाणार आहेत.