बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने अटक केली आहे. शनिवार २ ऑक्टोबर रोजी मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर एनसीबीने केलेल्या छापेमारीदरम्यान एनसीबीने ही कारवाई केली आहे. या प्रकरणी आर्यनसह ७ जणांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. गेल्या ८ ऑक्टोबरपासून आर्यन हा आर्थर रोड जेलमध्ये आहे. आर्यन खानला जामीन मिळावा यासाठी वकिलांकडून पुरेपूर प्रयत्न सुरु आहेत. आतापर्यंत सलग पाच वेळा आर्यनच्या जामीनावर सुनावणी झाली असली तरी त्याला जामीन मिळालेला नाही. दरम्यान गेल्या पाच दिवसांपासून आर्थर रोडमध्ये आर्यनच्या तब्येतीवर परिणाम जाणवू लागले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या दिवशी आर्यनला आर्थर रोड जेलमध्ये आणण्यात आले, त्या दिवसापासून आतापर्यंत त्याने अन्नाचा एकही घास खाल्लेला नाही. त्याला जेल मधील खाणे-पिणे आवडत नाही. त्यामुळे तो ते खात नसल्याचे बोललं जात आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच दिवसांपासून आर्यन फक्त बिस्किट आणि पाण्यावर दिवस काढत आहे. आर्यनने जेलमध्ये जाण्यापूर्वी पाण्याच्या १२ बाटल्या खरेदी केल्या होत्या. त्यातूनच तो पाणी पित असून जेलमधील पाण्याला स्पर्शही करत नाही. मात्र आता त्याच्या या पाण्याच्या बाटल्याही संपत आल्याचे बोललं जात आहे. मात्र याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

आणखी वाचा : आर्यन खानची केस लढवणाऱ्या अमित देसाईंचा युक्तिवाद, अन् क्षणार्धात सलमानला जामीन मंजूर; २०१५ मध्ये कोर्टात नेमकं काय घडलं?

विशेष म्हणजे फक्त आर्यन नाही तर त्याच्यासोबत असलेले इतर सर्वजणही जेलमधील अन्नाला स्पर्श करत नाही. दरम्यान न्यायालयाच्या आदेशापर्यंत त्याला बाहेरचे काहीही अन्न देण्यात येणार नाही. त्यांना फक्त तुरुंगाचे अन्न दिले जाणार आहे. आर्थर रोड जेलमध्ये सकाळी ७ वाजेपर्यंत त्याला नाश्ता दिला जातो. नाश्त्यामध्ये शीरा किंवा पोहे दिले जातात. त्यानंतर दुपारच्या ११ वाजता जेवणात चपाती, भाजी आणि डाळ, भात दिला जातो. तर रात्रीच्या वेळीही दुपारचे जेवण दिले जाते.

आर्यन खानच्या जामीनावर आज सुनावणी

आर्यन खानच्या जामीन याचिकेवर आज पुन्हा एकदा विशेष एनडीपीएस कोर्टात सुनावणी होत आहे. या प्रकरणाचा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांच्याकडे नसल्याच्या कारणाने दंडाधिकारी न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर हे प्रकरण विशेष न्यायालयात आले आहे. क्रूज ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला जामीन मिळाला नाही, तर शाहरुख खानने वकील सतीश मानशिंदे यांना बाजूला करत नवीन वकील अमित देसाई यांची नियुक्ती केली आहे. जामीन अर्जाची नोटीस दिल्यानंतर, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, ड्रग्जच्या प्रकरणात अनेक जामीन याचिका प्रलंबित असल्याने एजन्सीला उत्तर दाखल करण्यासाठी किमान एक आठवड्याचा अवधी हवा आहे.