बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि संजय दत्त लोकप्रिय अभिनेते आहेत. दोघांमध्ये एक खास बॉन्डिंग आहे. लवकरच दोघांचा 'शमशेरा' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पम त्याआधी रणबीरनं संजय दत्तचा बायोपिक 'संजू'मध्ये मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटानं रणबीरच्या करिअरला वेगळीच कलाटणी मिळाली. राज कुमार हिरानी दिग्दर्शित 'संजू'मध्ये संजय दत्तच्या आयुष्यात चांगल्या आणि वाईट दोन्ही बाजू मांडण्यात आल्या होत्या. रणबीरने ही भूमिका उत्तम पद्धतीने साकारली आणि चित्रपट हीट ठरला. पण हा चित्रपट प्रदर्शित होऊन चार वर्षं झाल्यानंतर रणबीरनं या चित्रपटाबाबत एक महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला 'संजू' चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात परेश रावल, विक्की कौशल, अनुष्का शर्मा, दीया मिर्जा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. रणबीरच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये 'संजू' एक दमदार चित्रपट मानला जातो. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर तब्बल ४ वर्षांनी रणबीर कपूर 'शमशेरा' चित्रपटातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात रणबीर आणि संजय दत्त दोघंही मुख्य भूमिकांमध्ये आहेत. सध्या रणबीर 'शमशेरा'चं प्रमोशन करत असून अशाच एका प्रमोशन इव्हेंटमध्ये रणबीरनं 'संजू'नंतर 'शमशेरा'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास एवढा वेळ का लागला? किंवा एवढा मोठा ब्रेक का घेतला? याची कबुली दिली. रणबीर म्हणाला, "मी कोणतीच भूमिका सोबत घेऊन घरी गेलो नाही. मी साकारली भूमिका सेटपर्यंतच मर्यादित असायची त्यानंतर मी त्या भूमिकेतून बाहेर पडून घरी जायचो. पण 'संजू'चं शूटिंग संपल्यानंतर असं झालं नाही. संजय दत्तच्या हँगओव्हरमधून बाहेर पडायला जरा वेळ लागला. माझे डोळे त्याच्यासारखे झाले होते. मी त्याच्यासारखा हसू लागलो होतो, त्याच्यासारखा चालत होतो. अशात त्या भूमिकेतून बाहेर पडण्यास मला थोडा वेळ लागला. पण या चित्रपटासारखा दुसरा कोणता चित्रपट होऊ शकत नाही." आणखी वाचा- Video : गर्दीत अडकलेल्या वाणी कपूरला रणबीरनं अशी केली मदत, व्हिडीओ चर्चेत दरम्यान रणबीर कपूर त्याचा आगामी चित्रपट 'शमशेरा'मध्ये पहिल्यांदाच दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. तो या चित्रपट वडील आणि मुलगा अशा दोन्ही भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात संजय दत्त आणि रणबीर कपूर यांच्या व्यतिरिक्त वाणी कपूर, आशुतोष राणा, सौरभ शुक्ला, रोनित रॉय, त्रिधा चौधरी आणि पितोबाश त्रिपाठी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. करण मल्होत्रा दिग्दर्शित हा चित्रपट येत्या २२ जुलैला हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.