‘वॉक तुरु तुरु’, ‘लई भारी पोरी’, ‘इश्काचा किडा’, ‘हंगामा’, ‘दिवाणा तुझा’ या म्युझिक अल्बम्समधून शिवाय ‘जलसा’, ‘मोल यांसारख्या चित्रपटांतून प्रकाशझोतात आलेला चेहरा म्हणजेच शीतल अहिरराव. ‘H2O कहाणी थेंबाची’ या आगामी मराठी चित्रपटात शीतल झळकणार आहे. आपल्या पदार्पणातच प्रेक्षकांची मने जिंकणारी शीतल ‘H2O कहाणी थेंबाची’ या चित्रपटात समाजप्रबोधन करताना दिसेल. शिवाय ‘व्हीआयपी गाढव’, ‘फक्त एकदाच’, ‘होरा’ आणि ‘सलमान सोसायटी’ हे शीतलचे आगामी चित्रपट असून लवकरच या ही चित्रपटांतून निरनिराळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.

पर्यावरणचा ढासळता समतोल अनेक संकटांना आमंत्रित करीत आहे. विकासाच्या हव्यासापायी केलेली अमानवी प्रगती भविष्यकाळात भीषण वास्तव घेऊन आपल्यासमोर उभी राहणार आहे. अशाच एक गंभीर विषयावर भाष्य करणारा मौलिक मराठी चित्रपट म्हणजे जी. एस. प्रोडक्शन प्रस्तुत सुनील झवर निर्मित आणि मिलिंद पाटील दिग्दर्शित ‘H2O कहाणी थेंबाची’ येत्या १२ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

मूळची नाशिकची शीतल ‘H2O कहाणी थेंबाची’ चित्रपटाविषयी बोलताना सांगते, ‘H2O’ चित्रपटाची स्क्रिप्ट अतिशय उत्तमरीत्या मांडली होती. स्क्रिप्ट वाचतानाच माझ्या अंगावर काटा आला. आपण जर पर्यावरणाचा असाच ऱ्हास करीत राहिलो तर भविष्यकाळ बिकट असल्याचं मला जाणवलं. मी क्षणाचाही विलंब न करता हा चित्रपट स्वीकारला. या चित्रपटाच्यानिमित्ताने माझ्या हातून समाजप्रबोधन घडेल जे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचं आहे.’

‘H2O’ चित्रपटात सियाची मध्यवर्ती भूमिका साकारणारी शीतल अहिरराव आपल्या आगामी कारकिर्दीत एका हिंदी मालिकेतही झळकणार आहे. या मालिकेची घोषणा लवकरच होणार असून ‘सरस्वती’ असं या मालिकेचं नाव आहे.