बॉलिवूडची ‘फिट गर्ल’ अर्थात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा गेल्या काही वर्षांमध्ये कलाविश्वातील वावर कमी झाला. मात्र या काळामध्ये ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या सतत संपर्कात होती. असं असलं तरीदेखील शिल्पाला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहता यावं अशी चाहत्यांची प्रचंड इच्छा होती. विशेष म्हणजे चाहत्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. शिल्पा लवकरच सब्बीर खान यांच्या चित्रपटामध्ये झळकणार आहे. या निमित्ताने बोलत असताना शिल्पाने १३ वर्षांपासून बॉलिवूडपासून फारकत का घेतली यामागचं कारण सांगितलं.

शिल्पा २००७ साली ‘लाइफ इन मेट्रो’ आणि ‘अपने’ या चित्रपटांमध्ये अखेरची झळकली होती. या चित्रपटांमध्ये तिची मुख्य भूमिका होती. त्यानंतर ती कोणत्याही चित्रपटामध्ये झळकली नाही. मात्र आता तब्बल १३ वर्षांनंतर ती कमबॅक करणार आहे. सब्बीर खान यांच्या आगामी ‘निकम्मा’ या चित्रपटामध्ये शिल्पा झळकणार आहे.

“मी कलाविश्वाचा एक भाग आहे आणि मी जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरीदेखील या इंडस्ट्रीचा एक भाग म्हणूनच राहिन. ज्यावेळी तुम्ही लाइमलाइट मिस करता त्यावेळी तुम्हाला खऱ्या अर्थाने कलाविश्वाची आठवण येते. तुम्हाला अचानकपणे वाटतं की तुम्ही एखादी गोष्ट गमवत आहात आणि लोकांना तुमचा विसर पडत चाललाय. परंतु ही भावना माझ्या मनात कधीच नव्हती. कारण मी सतत या ना त्या कारणामुळे छोट्या पडद्यावर काम करत होते. मात्र बॉलिवूडपासून काही काळ दूर जाण्याचा निर्णय मी माझ्या मर्जीने घेतला होता”, असं शिल्पा म्हणाली.

पुढे ती म्हणते, “अभिनेत्री होणं हे माझ्यासाठी लक बाय चान्स होतं. मी १५ वर्षांची असताना एका कार्यक्रमात गेले होते आणि तिथे एका व्यक्तीने माझा फोटो काढला. विशेष म्हणजे दुसऱ्याच दिवशी तो फोटो एका कार्यक्रमाच्या सेटवर होता आणि त्या कार्यक्रमापासून माझा कलाविश्वातील प्रवास सुरु झाला”.

दरम्यान, शिल्पाने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. मात्र या साऱ्या चित्रपटांमध्ये तिचा ‘धडकन’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत अभिनेता अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी यांनी स्क्रीन शेअर केली होती. शिल्पाने १३ वर्षांपासून कलाविश्वापासून फारकत घेतली असली तरीदेखील ती सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असते. तसंच तिला योग आणि व्यायामाची आवड असल्यामुळे यावर आधारित काही पुस्तके आणि सीडीही तिने लॉन्च केली आहेत.