Raj Kundra Arrest : पतीच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी पहिल्यांदाच झाली व्यक्त; Instagram वर पोस्ट करत म्हणाली…

सोमवारी राज कुंद्रांना अटक झाल्यानंतर पहिल्यांदाच शिल्पा सोशल नेटवर्किंगवरुन व्यक्त झालीय, तिने एक खास फोटो शेअर करत सूचक शब्दांमध्ये मानसिक स्थिती सांगितलीय

Shilpa Shetty shares FIRST post amid husband Raj Kundra arrest in pornography case
इन्स्ताग्राम स्टोरीमध्ये पोस्ट केला एक खास फोटो

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योजक राज कुंद्रा यांना सोमवारी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणामध्ये अटक केली. त्यानंतर शिल्पा शेट्टीसंदर्भात बऱ्याच चर्चा झाल्या. मात्र आता राज यांना अटक झाल्यानंतर शिल्पा पहिल्यांदाच इन्स्टाग्रामवरुन व्यक्त झाल्याचं पहायला मिळत आहे. कुंद्रा यांच्या अटकेनंतर शिल्पाने प्रत्यक्षात समोर येऊन प्रसारमाध्यमांशी संवाद साधला नाही. तरीही शिल्पाचा या प्रकरणामध्ये काही सहभाग आहे का?, शिल्पाला याची कल्पना होती का? या आणि अशा बऱ्याच चर्चा रंगल्याचं चित्र पहायला मिळालं. सोमवारपासून शिल्पाने कामाबरोबरच सोशल मीडियावरुनही ब्रेक घेतला होता. मात्र गुरुवारी रात्री तिने एक इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केलीय. या पोस्टमध्ये तिने एका पुस्तकाच्या पानाचा फोटो शेअर केलाय. यामध्ये जेम्स थर्बर या लेखाचं एक वाक्य दिसून येत आहे. “रागात मागे वळून पाहू नका किंवा घाबरुन येणाऱ्या काळाकडे पाहू नका उलट जागरुक राहून याकडे पाहा,” असा या वाक्याचा अर्थ आहे.

नक्की पाहा >> कंडक्टरचा मुलगा, हिरे व्यापारी, शिल्पा शेट्टीशी लग्न ते पॉर्न प्रकरण; राज कुंद्रांबद्दलच्या ३० खास गोष्टी

ज्या लोकांनी आपल्याला दुखावलं आहे, ज्यांनी आपल्याला निराशेच्या गर्तेत ढकललं, ज्यांच्यामुळे आपल्याला दुर्देव असल्यासारखं वाटलं त्या लोकांच्या भूतकाळाकडे आपण रागाने वळून पाहतो. भविष्याकडे पाहतानाही आपण माझी नोकरी जाईल, मला एखादा आजार होईल किंवा जवळच्या एका व्यक्तीचे निधन होईल या भीतीमध्ये जगत असतो. आपण सध्याच्या वर्तमानामध्ये जगायला शिकलं पाहिजे. काय घडलं आणि काय घडणार याबद्दल विचार करण्याऐवजी आहे त्या वास्तवात जगलं पाहिजे, असा या पोस्टमधील लेखकाच्या ओळींचा अर्थ आहे.

नक्की वाचा >> अटकेनंतर राज कुंद्रांनी पहिल्यांदाच न्यायालयासमोर मांडली भूमिका, म्हणाले, “तो कंटेट पॉर्न नाही तर…”

मी जिवंत असल्याबद्दल स्वत:ला भाग्यवान समजतो आणि मोठा श्वास घेतो. मी भूतकाळामध्ये अनेक आव्हानांना तोंड दिलं आहे आणि भविष्यातही देईन. माझं आजचं आयुष्य जगण्यापासून मला कोणीही विचलित करु शकत नाही, असं या पोस्टच्या शेवटच्या ओळींमध्ये लिहिण्यात आलं आहे.

Shilpa Shetty Instagram Post

या पोस्टच्या माध्यमातून शिल्पाने एकप्रकारे तिच्या मनाची परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न केल्याचं दिसत आहे. अर्थात तिने पती राज कुंद्रांना झालेल्या अटकेसंदर्भात किंवा एकंदरितच या प्रकरणासंदर्भात थेट कसलाही उल्लेख केलेला नाही. मात्र या पोस्टमधून तिने येणारी सर्व आव्हान स्वीकारण्यास तयार असल्याचे संकेत दिेले आहेत. या प्रकरणामध्ये शिल्पाचा काही सहभाग आहे का याचाही पोलीस तपास करत आहेत. सध्या तरी शिल्पाचा या प्रकरणामध्ये काही सहभाग असल्याचं दिसत नाहीय असं पोलिसांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं होतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shilpa shetty instagram post after husband raj kundra arrest scsg