काही दिवसांपूर्वी घरातच काचेच्या टेबलवर पडल्यामुळे खतरों के खिलाडीमधील स्पर्धक अभिनेता शिविन नारंगच्या डाव्या हाताला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण आता त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

नुकताच शिविनने सोशल मीडिया पोस्टद्वारे रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याचे सांगितले आहे. त्याने पोस्टमध्ये रुग्णालयातील त्याचा एक फोटो शेअर करत त्याची काळजी घेणाऱ्या डॉक्टर आणि नर्सचे आभार मानले आहेत.

‘आता मी ठिक आहे. माझ्या कुटुंब, मित्र परिवार आणि चाहत्यांसाठी मी घरत परत येत आहे. मी लवकरात लवकर ठिक होण्यासाठी तुम्ही प्रार्थना केली त्यासाठी तुमचे आभार. दुर्दैवाने घरात माझ्यासोबत एक घटना घडली आणि मी जखमी झालो होतो. त्यानंतर माझ्या हाताची सर्जरी झाली’ असे त्याने कॅप्शनमध्ये म्हटले आहे. शिविनला मुंबईमधील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनी आणि नर्सने त्याची योग्य पद्धतीने काळजी घेतल्यामुळे त्याने त्यांचे आभार मानले आहेत.

शिवीनने ‘बेहद 2’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली आहे. या मालिकेत त्याच्यासोबत छोट्या पडद्यावरील सुंदर अभिनेत्रींपैकी एक जेनिफर विंगेट काम करताना दिसत आहे. त्या दोघांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत आहे. पण सध्या लॉकडाउनमुळे मालिकांचे चित्रीकरण काही काळासाठी थांबवण्यात आले आहे. बेहद २ मालिकेसोबतच शिवीनने खतरों के खिलाडीमध्ये ही सहभाग घेतला होता. इतकच नव्हे तर शिवीन खतरों के खिलाडीमधील स्पर्धक अभिनेत्री तेजस्विनी प्रकाशला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण नंतर या सर्व अफवा असल्याचे तेजस्विनीने स्पष्ट केले होते.