मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सशस्त्र क्रांतीपासून हिंदूत्ववादाबद्दलची त्यांची मुलभूत विचारसरणी कायम दुर्लक्षित राहिली. त्यांचा हा न कळलेला चेहरा, त्यांचे विचार ‘कालजयी सावरकर’ या लघुपटातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकरांची जडणघडण, देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी त्यांनी घेतलेला ध्यास, लोकमान्य टिळकांच्या विचारांचा त्यांच्यावर झालेला परिणाम आणि त्यातून त्यांनी पुढे ‘अभिनव भारत’ची केलेली स्थापना, त्यांनी मांडलेल्या विचारांमागची त्यांची भूमिका उलगडणाऱ्या ‘कालजयी सावरकर’ या लघुपटाची निर्मिती ‘साप्ताहिक विवेक समूहा’तर्फे करण्यात आली आहे. प्रसिध्द जाहिरातकार गोपी कुकडे यांनी या लघुपटाचे दिग्दर्शन केले असून अभिनेता सौरभ गोखले, तेजस बर्वे, मनोज जोशी यांच्या या लघुपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. या लघुपटाचा खास खेळ नुकताच दादर येथील प्लाझा चित्रपटगृहात ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. यावेळी चित्रपटातील सर्व प्रमुख कलाकार, संकल्पनाकार दिलीप करंबेळकर, दिग्दर्शक गोपी कुकडे आणि तंत्रज्ञ यावेळी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 ‘पारतंत्र्याचा अर्थ हा अंधकारच असतो. सावरकरांना हे पूर्ण उमगले होते. पारतंत्र्यातून मायभूमीला मुक्त करण्यासाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या सावरकरांचे खरे दर्शन समाजाला घडलेच नाही. कोणाशीही तुलना न करता सावरकरांची ही न कळलेली बाजू, त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या लघुपटाच्या माध्यमातून करण्यात आला याचा आनंद वाटतो’, अशी भावना दिग्दर्शक राजदत्त यांनी यावेळी व्यक्त केली. सावरकरांचे कालजयी विचार मांडणारा हा लघुपट विविध संस्थांच्या माध्यमातून तसेच स्वतंत्रपणे त्याचे खेळ आयोजित करत लोकांपर्यंत पोहोचवण्यात येणार असल्याची माहिती दिलीप करंबेळकर यांनी यावेळी दिली.