बॉलिवूडमधील इतर कलाकरांप्रमाणेच अभिनेत्री श्रद्धा कपूर देखील गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करते. श्रद्धाच्या लहानपणीच्या अनेक आठवणी गणेशोत्सवाशी जोडल्या असल्याचे तिने सांगितले आहे. स्वत:च्या व्यग्र वेळापत्रकामधून वेळ काढून श्रद्धा कुटुंबीयांसोबत गणेशोत्सव साजरा करत आहे.
श्रद्धा कपूरने गणेश चतुर्थी निमित्त तिच्या लहानपणीच्या आठवणी शेअर केल्या आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये श्रद्धाने गेल्या कित्येक वर्षांपासून तिच्या घरी गणपती बाप्पाची स्थापना करत असल्याचे सांगितले आहे. गणपतीच्या पूजेसाठी श्रद्धाची आई आणि तिची मावशी साडी नेसत असून बाप्पाच्या आगमनासाठी संपूर्ण घर सजावत असे. बाप्पाचा आशिर्वाद घेण्यासाठी त्यांचे नातेवाईक घरी येत असल्याचे देखील श्रद्धाने सांगितले आहे. श्रद्धाच्या आईच्या चुलत बहिणीदेखील घरी येत असत. दरम्यान आईच्या या सर्व बहिणी श्रद्धापेक्षा वयाने लहान असल्याचे श्रद्धाला कळाले. हे कळताच श्रद्धा आश्चर्यचकित झाली होती.
आणखी वाचा: “ही झाडे आमची, नाही कुणाच्या बापाची”, आरेचे जंगल वाचवण्यासाठी श्रद्धा कपूरचा नारा
श्रद्धाने या मुलाखतीमध्ये आजी- आजोबांच्या आठवणींना देखील उजाळा दिला. त्यांच्या घरात गणपती आणण्याची प्रथा तिच्या आजी-आजोबांनीच सुरु केली असल्याचे देखील श्रद्धाने सांगितले आहे. श्रद्धा कपूरचे आजोबा प्रसिद्ध शास्त्रीय गायक होते आणि गणेशोत्सवाच्या दिवशी त्यांच्या घरी संगीतमय मैफिल होत असे.