नीलेश अडसूळ
आषाढाची कूस बदलून श्रावणसरी येतात अन् सभोवतालचा ओलावा, हिरवळीचा गिलावा नेत्रसुखद वाटतो. तसेच नेत्र आणि मन सुखावणारे क्षण सध्या प्रेक्षक अनुभवत आहेत. कारण मालिका जगतातही कूस बदलून नव्या मालिकांच्या श्रावणसरी सध्या बरसू लागल्या आहेत. ठरावीक काळाने हा टप्पा येत असला तरी सध्या काही मालिकांना प्रेक्षक अक्षरश: कंटाळले होते, त्यामुळे नव्याचे कौतुक जरा जास्तच आहे. आता ही नवलाई प्रेक्षकांच्या पसंतीस किती उतरते हा मुद्दा कायम असला तर काही दिवस का होईना नवे काही डोळ्यांपुढे तरळल्याचे सुख नाकारता येणार नाही. त्या निमित्ताने नवे कलाकर, नवा आशय आणि नव्याची प्रसन्नता घराघरात पोहोचेल. मग मालिकांमधून येणारे सणवार, मंगळागौर, गणेशोत्सव यामुळे काही महिने तरी मजेशीर जाणार आहेत. अर्थात यात विरजण घालणारे खलनायकी कावेही असतीलच, पण नव्या मालिकांची  ही नुकतीच सुरुवात असल्याने तेही उत्कंठावर्धक असतील यात काही शंका नाही. आता या मालिका प्रेक्षकांची तहान भागवतील की मनोरंजनाचा महापूर आणतील की आणखी काही हे मात्र हळहळू उलगडत जाईल.

ल्ल  झी मराठी वाहिनीवर नव्या मालिकांचे पेव आले आहे. एकाच वेळी पाच मालिका प्रेक्षक भेटीला येत आहेत. ‘मन झालं बाजिंद’, ‘मन उडू उडू झालं’, ‘माझी तुझी रेशीमगाठ’, ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’, ‘ती परत आलीय’ अशी या पाच मालिकांची नावे आहेत. विशेष म्हणजे टाळेबंदीमुळे काही काळ थांबलेली ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिकादेखील पुन्हा येऊ घातली आहे. त्यामुळे  झी मराठीवर  मनोरंजनाची नवी उधळण जोरदार होणार आहे. या मालिकांमधून अनेक नवे-जुने चेहरे  प्रेक्षक भेटीला येत आहेत. अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे हे दोन आघाडीचे कलाकार ‘माझी तुझी रेशीमगाठ’ तर अजिंक्य राऊत आणि हृता दुर्गुळे हे ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. विशाल चव्हाण आणि श्वेता राजन ही नवी जोडी ‘मन झालं बाजिंद’ या मालिकेत असेल. तर प्रेक्षकांचा लाडका राणादा म्हणजे हार्दिक जोशी ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं..’ या मालिकेतून पुन्हा एकदा झी मराठीवर येणार आहे. या मालिकेत अमृता पवार त्याची नायिका असेल. विशेष म्हणजे ज्येष्ठ अभिनेते विजय कदम बऱ्याच वर्षांनी मालिका विश्वात आले आहेत. ‘ती परत आलीय’ या गूढ कथेवर बेतलेल्या मालिकेत ते एक आगळीवेगळी भूमिका साकारत आहेत.

ल्ल नव्या मालिकांचा मळा फुलला असला तरी या बदल्यात पाच मालिका आपली रजा घेत आहेत. त्यामध्ये ‘पाहिले न मी तुला’, ‘कारभारी लयभारी’, ‘अग्गंबाई सुनबाई’, ‘माझा होशील ना’, ‘देवमाणूस’ या मालिकांचा समावेश आहे. ‘देवमाणूस’ मालिकेतील ग्रामीण जीवनाने आणि आशयाने प्रेक्षकांचे चांगलेच मन जिंकले होते. ‘कारभारी लयभारी’ ही मालिकादेखील फार कमी वेळातच चर्चेत आली. पण ‘पाहिले न मी तुला’ आणि ‘माझा होशील ना’ या मालिकांनी मात्र वेळेच्या आधी निरोप घेतल्यासारखे वाटते. अर्थात त्या मालिका ज्या आवेशात आल्या तितका आवेश फार काळ टिकू शकला नाही. सई आदित्यच्या लग्नापर्यंत आलेली ही रम्य कथा लग्नानंतर विस्कळीत होत गेली. ‘माझा होशील ना’ या मालिकेतही सुरुवातीला असलेली पकड हळूहळू निसटल्यासारखी वाटली, तर ‘अग्गंबाई सुनबाई’ या मालिकेला मात्र सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची फारशी पसंती मिळाली नाही. ‘सासूबाई’नंतर लगेच ‘सूनबाई’चा अध्याय सुरू झाल्याने आणि पुन्हा विवाहबाह्य़ संबंध, कौटुंबिक नात्यातील अतिरंजकता यामुळे प्रेक्षकांच्या टीकास्थानी ही मालिका होती. याविषयी समाजमाध्यमांवरही प्रेक्षकांनी आपली मते मांडली आहेत.

ल्ल सोनी मराठी वाहिनीवर गेल्या महिन्यातच दोन नव्या मालिकांचे खाते उघडले आहे. ‘कोण होणार करोडपती’ आणि ‘अजूनही बरसात आहे’ या दोन्ही मालिका १२ जुलैला सुरू झाल्या. सध्या करोडपती होण्यासाठीचा ज्ञानाचा खेळ घराघरात पाहिला जातो आहे. तर ‘अजूनही बरसात आहे’ ही मालिका तरुणाईला विशेष भिडल्याचे दिसते. गेल्या काही आठवडय़ात मालिकेतील भाग, त्याचे फोटोज आणि एकूणच आशयाविषयी समाजमाध्यमांवर सकारात्मक लिहिले जात आहे. मुक्ता बर्वे आणि उमेश कामत यांच्या दर्जेदार अभिनयाने आणि रोहिणी निनावे, मुग्धा गोडबोले  यांच्या लेखणीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तर येत्या सोमवारपासून ‘वैदेही’ ही मालिका प्रेक्षक भेटीला येत आहे. देव दिखाव्याला नाही श्रद्धेला पावतो, असे सांगणाऱ्या या मालिकेत वैदेही ही रामाची निस्सीम भक्त असून लोकांच्या मदतीसाठी धावून जाण्याचा तिचा स्वभाव आहे.

तितक्याच सक्षमतेने कुटुंबाची जबाबदारी पेलणाऱ्या वैदेहीची भूमिका अभिनेत्री सायली देवधर साकारते आहे. या मालिकेत अभिनेत्री पल्लवी अजय पाटील आणि तृष्णा चंद्रात्रे यादेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या वाहिनीवरील ‘श्रीमंताघरची सून’ या मालिकेने निरोप घेतला असून आणि ‘आई माझी काळुबाई’ ही मालिकाही येत्या रविवारी रजा घेणार आहे.

ल्ल स्टार प्रवाह वाहिनीवर नुकतेच म्हणजे २६ जुलै रोजी ‘जय भवानी जय शिवाजी’ या ऐतिहासिक मालिकेचे पदार्पण झाले. शिवगाथेसोबतच स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या मावळ्यांची चरित्रे या मालिकेतून मांडली जात आहेत. २ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या या मालिकेला कठोर निर्बंध लागू झाल्याने दिरंगाई झाली. यात अभिनेता भूषण प्रधान छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे, तर अभिनेत्री  निशिगंधा वाड जिजाऊंच्या भूमिकेत आहेत. याच वाहिनीवर ‘मी होणार सुपरस्टार’ हा कार्यक्रम २१ ऑगस्टपासून सुरू होतो आहे. नृत्यावर आधारलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्रभरातले एकापेक्षा एक स्पर्धक आपली कला सादर करणार आहेत. या कार्यक्रमाच्या परीक्षकाची जबाबदारी अभिनेता अंकुश चौधरी पार पाडणार आहे. अंकुश चौधरी तब्बल २० वर्षांनंतर या कार्यक्रमाच्या निमित्ताने मालिका जगतात पुन्हा आला आहे. संस्कृती बालगुडे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असून  हिंदी रिअ‍ॅलिटी शो गाजवणारे वैभव घुगे आणि कृती महेश या कार्यक्रमाचे कॅप्टन आहेत.