मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेचा आज वाढदिवस. मराठी चित्रपटसृष्टीतून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या श्रेयसनं बॉलिवूडमध्येही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. जवळपास दीड दशकाच्या त्याच्या अभिनय कारकिर्दीत त्यानं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. बॉलिवूडमध्ये ‘ओम शांति ओम’, ‘गोलमाल सीरीज’, ‘वाह ताज’ आणि ‘इकबाल’ सारखे हिंदी तसेच मराठीमध्ये जवळपास ४५ चित्रपटांत काम करणाऱ्या श्रेयसनं त्याच्या करिअरमध्ये खडतर काळही पाहिला आहे. पण त्यांच्या बॉलिवूड पदार्पणाच्या ‘इकबाल’ चित्रपटाला मात्र उत्तम प्रतिसाद मिळाला होता. याच चित्रपटाच्या वेळी असं काही घडलं होतं जे श्रेयससाठी खूपच धक्कादायक होतं.

श्रेयस तळपदेनं ‘इकबाल’ या चित्रपटातून त्याच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात त्यानं एका दिव्यांग किक्रेटपटूची भूमिका साकारली होती. ‘इकबाल’ चित्रपटातील श्रेयसच्या अभिनयाचं बरंच कौतुकही झालं होतं. याच चित्रपटात दिग्गज अभिनेता नसीरुद्दीन शाह यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती आणि चित्रपटाचं दिग्दर्शन नागेश कुकुनूर यांनी केलं होतं. अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असतानाच श्रेयसच्या खऱ्या आयुष्यात मात्र मोठा ट्वीस्ट आला होता.

श्रेयसनं एका मुलाखतीत त्याच्या पहिल्या वहिल्या बॉलिवूड चित्रपटाच्या वेळचा एक किस्सा शेअर केला होता. तो म्हणाला, ‘चित्रपटाचं शूटिंग सुरू होण्याअगोदर मी दिग्दर्शकांकडे तीन दिवसांची सुट्टी मागितली होती. त्यावेळी नागेश यांना वाटलं की मला पार्टी करण्यासाठी सुट्टी हवी आहे. पण जेव्हा त्यांना समजलं की मी लग्न करणार आहे तेव्हा त्यांनी मला लग्नच रद्द करण्यास सांगितलं. या चित्रपटात मी एका टीनएजर क्रिकेटपटूची भूमिका साकारली होती. अशात मी विवाहित आहे हे सर्वांसमोर येणं चित्रपटासाठी योग्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी मला, ‘तू लग्न रद्द कर’ असं सांगितलं होतं.’

View this post on Instagram

A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रेयस पुढे म्हणाला, ‘त्यावेळी मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा होतो. सर्वांना लग्नपत्रिका दिल्या गेल्या होत्या. अशावेळी जेव्हा मला लग्नच रद्द करायला सांगितलं गेलं तेव्हा काय करावं हे सुचत नव्हतं. त्यानंतर मी बरेच प्रयत्न करून दिग्दर्शकांना समजावलं की मी माझ्या लग्नाबद्दल कोणालाच काहीच सांगणार नाही. सर्व काही गुपित ठेवेन. त्यावेळी त्यांनी लग्नासाठी फक्त एका दिवसाची सुट्टी दिली होती.’ दरम्यान अलिकडेच श्रेयसच्या लग्नाला १७ वर्ष पूर्ण झाली. त्यावेळी त्यानं लग्नाचा जुना फोटो शेअर करत पत्नी दिप्तीला शुभेच्छा दिल्या होत्या.