‘भारत माझा देश आहे. आम्ही सारे भारतीय बांधव आहोत..’ या आम्हा साऱ्या विविध रंगांच्या, भाषेच्या, जातीच्या-धर्माच्या बांधवांना भारत नावाच्या एका देशात मनमिळाऊपणे आणि एकजुटीने, एका विचाराने राहता यावे यासाठी या देशाला स्वत:चे असे शासन हवे होते. लोकांनी लोकांसाठी बनवलेले लोकांचे राज्य अशा सार्थ शब्दांत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जी लोकशाही राज्याची घटना ‘संविधान’ लोकांसमोर ठेवले, त्याच्या निर्मितीची कथा ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या ‘संविधान’ या नव्या छोटेखानी मालिकेतून उलगडणार आहे.
भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीची कथा फार प्रेरणादायी आहे. राज्यघटनेची निर्मिती करताना अनेकविध गोष्टींचा, तत्त्वांचा फार खोलवर जाऊन अभ्यास केलेला असल्याने घटनांची अनेक वेगवेगळी परिमाणे आपल्याला जाणवत राहतात. त्यामुळे मालिके च्या रूपाने राज्यघटनेचा आणि आपल्या संसदीय लोकशाहीचा इतिहास मांडायची संधी मिळाल्याबद्दल आपल्याला आनंद झाला, असे श्याम बेनेगल यांनी सांगितले. डीडी राज्यसभा या वाहिनीसाठी बेनेगल यांनी ‘संविधान’ची निर्मिती केली असून २ मार्चपासून सकाळी १० वाजता भारतीय संविधानाची ही कथा छोटेखानी दहा भागांत प्रसारित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
‘संविधान’च्या निमित्ताने श्याम बेनेगल २५ वर्षांनी टेलिव्हिजन माध्यमात परतले असून याआधी त्यांनी ‘भारत एक खोज’ या मालिकेची निर्मिती आणि दिग्दर्शन केले होते. ‘रांझना’ फेम अभिनेत्री स्वरा भास्कर हिने या मालिकेत सूत्रधाराची भूमिका बजावली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका सचिन खेडेकर यांनी केली असून एरव्ही खलनायकाच्याच भूमिको गाजवणारे अभिनेते दिलीप ताहिल पहिल्यांदाच पंडित नेहरूंच्या भूमिकेत दिसणार आहेत. स्वतंत्र भारताचा इतिहास दृक-श्राव्य माध्यमात संग्रहित व्हावा, असा आमचा विचार होता. ‘संविधान’च्या रूपाने डीडी राज्यसभा वाहिनीवर हा आपला पहिला प्रयत्न असल्याचे वाहिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुरुदीप सिंग सप्पाल यांनी म्हटले आहे.