तालिबानने अफगाणिस्तानचा पूर्णपणे ताबा घेतला आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी देश सोडून पळून गेले आहेत. अफगाणिस्तानमधील धक्कादायक व्हिडीओ आणि फोटोज पाहून जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. तब्बल 20 वर्षांनंतर तालिबाननं अफगाणिस्तान देश ताब्यात घेतलाय. हजारो लोक अफगाणिस्तानातून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हृदयद्रावक दृश्ये सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अलीकडेच बिग बॉस 13 चा विजेता सिद्धार्थ शुक्ला यानेही याबद्दल चिंता व्यक्त केली आणि अफगाणिस्तानसाठी एक खेदजनक पोस्ट शेअर केली. त्याच्या या पोस्टवरून सोशल मीडियावर सध्या तो खूपच ट्रोल होतोय.

अफगाणिस्तानमध्ये सध्या तालिबानचं राज्य आलं आहे. संपूर्ण देशात हाहाकार सुरू आहे. तर नागरीक अक्षरशः सैरावैरा पळताना दिसत आहेत. अनेक नागरिकांनी आपले प्राणही गमावले आहेत. त्यावर आता जगभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. तर बॉलिवूडनेही आता आपलं मौन सोडलं आहे. ‘बिग बॉस १३’ चा विजेता सिद्धार्थ शुक्लाने सुद्धा त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर दुःख व्यक्त केलंय. इन्स्टाग्रामवर त्याचा एक ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट फोटो शेअर करत त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या फोटोमुळेच सौशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरूवात केलीय.

सिद्धार्थ शुक्लाने शेअर केलेल्या या ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट फोटोमध्ये त्याने डोक्याला हात लावून बसलेला दिसून येत आहे. या फोटोमध्ये त्याच्या चेहऱ्यावर खूपच दुःखी आणि निराशेचे भाव दिसून येत आहेत. हा फोटो शेअर करत त्याने लिहिलंय, “अफगाणिस्तानमधली परिस्थिती पाहून खूप हताश झालोय. खरंच माणूसकी जिवंत आहे का?” सिद्धार्थ शुक्लाच्या या पोस्टवरून काही युजर्सनी त्यावर सकारात्मक कमेंट्स शेअर करत त्याला पाठिंबा तर दिलाय. पण काही युजर्सनी तर त्याला टार्गेट करण्यास सुरूवात केलीय.

सिद्धार्थ शुक्लाच्या या पोस्टवर नेटिझन्सकडून टीकांचा भडीमार सुरू झाला आहे. “इथेही नाटक सुरूच आहे का?” असा सवाल करत काही युजर्सनी त्याला ट्रोल केलंय. खरं तर सिद्धार्थ शुक्लाच्या या फोटोशूटसोबत शेअर केलेली पोस्ट नेटकऱ्यांना खटकली आहे. सोशल मीडियावर सिद्धार्थ शुक्ला ट्रोलर्सचा निशाणा होत असल्याचं पाहून त्याचे फॅन्स सुद्धा त्याला पाठिंबा देताना दिसून आले. “काही कलाकार तर अशा मुद्द्यावर बोलत सुद्धा नाहीत…पण तू नेहमीच सत्याच्या बाजुने असतोस” अशा कमेंट्स करत त्याचे फॅन्स बचाव करताना दिसून येत आहेत.