पंजाबचा गायक सिद्धू मुसेवाला यांची गेल्या रविवारी (२९ मे) गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. या घटनेला एक आठवडा उलटला आहे. मुसेवाला यांच्या अंत्यसंस्कारावेळी पंजाबमधील आप सरकारविरोधात घोषणाबाजी करत आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी चाहत्यांकडून केली जात आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर सिद्धू मुसेवाला यांच्या आई-वडिलांनी चंदीगडमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी सिद्धू मुसेवालाचे पालक गृहमंत्र्यांना भेटण्यासाठी पोहोचताच ढसाढसा रडू लागले. यावेळी त्या दोघांनही आपल्या मुलाला न्याय देण्याची मागणी केली. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केंद्रीय यंत्रणांकडून केली जावी, अशीही मागणी त्यांनी केली.

एएनआय या वृत्तसंस्थेने नुकंतच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि सिद्धू मुसेवाला यांचे आई वडील पाहायला मिळत आहेत. यावेळी सिद्धू मुसेवाला याचे वडील हात जोडून अमित शाहांकडे मुलाला न्याय देण्याची मागणी करत आहेत. यावेळी ते दोघेही ढसाढसा रडत असल्याचेही दिसत आहेत.

नेमकं प्रकरण काय?

पंजाबच्या मानसा जिल्ह्यात अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर केलेल्या गोळीबारात सिद्धू मुसेवाला यांचा मृत्यू झाला होता. मुसेवाला (२७) हे जवाहर के या त्यांच्या खेड्यात जीपमधून जात असताना झालेल्या AK 47 या बंदुकीने केलेल्या गोळीबार करण्यात आला. त्यावेळी ३२ राऊंड फायर करण्यात आले. त्यात त्यांच्या शरीरात १६ गोळ्या लागल्या. या घटनेमुळे हत्येने पंजाबमध्ये खळबळ उडाली होती.

या घटनेनंतर पंजाब पोलिसांशिवाय हरियाणा आणि इतर राज्यांच्या पोलिसांनाही सतर्क करण्यात आले आहे. पोलीस पथक दोन्ही वाहनांचा शोध घेत आहे. सीमावर्ती भागात वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.

पंजाब सरकारचे एक पाऊल मागे

काही दिवसांपूर्वी पंजाबमधील भगवंत मान सरकारने राज्यातील काही माजी मंत्री आणि आमदारांची सुरक्षा व्यवस्था काढून घेतली होती. त्यानंतरच सिद्धू मुसेवाला यांची हत्या करण्यात आली होती. सरकारच्या या निर्णयाविरोधात पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री ओपी सोनी यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती.

या याचिकेवरील सुनावणीदरम्यान, पंजाब सरकारने न्यायालयात महत्त्वाच्या व्यक्तींना पुन्हा एकदा सुरक्षा बहाल केली जाईल असे सांगितले होते. पंजाब सरकारने पंजाब आणि हरियाणामधील उच्च न्यायालयात याबाबतची माहिती दिली आहे. येत्या ७ जूनपासून या महत्त्वाच्या व्यक्तींना सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा बहाल केली जाईल, असे सांगितले आहे.