सासू सुनांच्या भरमसाट ‘मेलोड्रामा’ असणाऱ्या मालिकांच्या गर्दीतही एका मालिकेने मात्र स्वत:चं वेगळेपण जपलं आहे. ती मालिका म्हणजे, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. बऱ्याच वर्षांपासून सुरु असणाऱ्या या मालिकेचे जुने भागही आज तितक्याच आवडीने पाहिले जातात. पण, लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली ही मालिका आता मात्र प्रेक्षकांचा निरोप घेण्याची चिन्हं आहेत. या मालिकेच्या यशाला कुठेतरी गालबोट लागलं असून, ‘शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी’ (SGPC) ने हा कार्यक्रम बंद करण्याची मागणी केली आहे. काही आक्षेपार्ह आणि निंदाजक दृश्ये असल्यामुळेच या मालिकेवर तात्काळ बंदीची मागणी केली आहे.
‘एसजीपीसी’चे प्रमुख कृपालसिंग बादुंगर यांनी माध्यमांना उद्देशून जारी केलेल्या एका निवेदनामध्ये याविषयीची विस्तृत माहिती दिली. शिखांचे दहावे धर्मगुरु, गुरु गोविंद सिंग यांच्या जिवंत स्वरुपाचं चित्रण केल्यामुळे शीख समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत आणि असं करणं शीख समुदायात आखून देण्यात आलेल्या नियमांविरोधात आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. ‘कोणताच अभिनेता किंवा कोणत्याही भूमिकेतून कोणीही स्वत:ला शिखांच्या दहाव्या धर्मगुरुंच्या म्हणजेच गुरु गोविंद सिंग यांच्या बरोबरीचं स्थान देऊ शकत नाही. कारण हा अक्षम्य गुन्हा आहे’, असं ते म्हणाले.
पाहा : सलमान, हृतिकला टक्कर देतोय हा आयपीएस अधिकारी
सध्याचं एकंदर वातावरण पाहता शीख समुदायातील अतिशय महत्त्वाच्या संघटनेने या मालिकेवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. यासोबतच त्यांनी मालिकेचे दिग्दर्शक आणि वाहिनीलाही यासंबंधीची नोटीस पाठवली आहे. शीख समुदायातर्फे होणारा विरोध पाहता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचं भविष्य काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण, येत्या काळात या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला तर मात्र अनेकांचीच निराशा होईल यात शंका नाही.