रेश्मा राईकवार

परदेशात राहून घरसंसारात रमण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्त्रीकडून ती एक चांगली आई नाही, असा शेरा मारत तिची दोन्ही मुलं हिसकावून घेतली जातात तेव्हा काय काय होऊ शकतं? अत्यंत असाहाय्य, हतबल बनवणाऱ्या अशा प्रकारच्या घटनेचा वास्तव सामना करणाऱ्या आईची कथा ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ हा आशिमा छिब्बर दिग्दर्शित चित्रपट अत्यंत साध्या-सरळ पद्धतीने आपल्यासमोर ठेवतो.

आई आणि मुलं यांच्यातील नात्याला ना कुठली व्याख्या ना कुठली बंधनं ना चौकट. नैसर्गिकरीत्या उमलत जाणारं हे नातं. हे नातंच मुळी अनेक भावनांचं पदर असलेलं आहे. यात दुसऱ्या कुठल्या अतिरंजित नाटय़ाची जोड देण्याची गरज नाही हे ओळखून जे घडलं आहे ते मांडण्यातून काही सांगण्याचा प्रयत्न ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या चित्रपटातून दिग्दर्शिका आशिमा छिब्बर यांनी केला आहे. नॉर्वेत राहणारं अनिरुद्ध आणि देबिका हे जोडपं. नॉर्वे चाइल्ड वेल्फेअर सोसायटीची काही माणसं अनिल्द्ध आणि देबिका त्यांच्या दोन्ही मुलांचं पालनपोषण नीट करत आहेत की नाही याबद्दल कसून चौकशी करत आहेत. आठवडाभर सुरू असलेल्या या चौकशीमुळे आत्तापर्यंत जगापासून लपवलेले या दोघांमधील नात्याचे ताणेबाणे हळूहळू बाहेर येऊ लागतात. या दोघांमधील संवाद सुरू असतानाच देबिकाच्या पाच महिन्यांच्या तान्ह्या मुलीला घेऊन वेल्फेअरची मंडळी पळ काढतात, इतकंच नव्हे तर देबिकाच्या आधी तिच्या मुलालाही शाळेतून परस्पर घेऊन निघून जातात. माझी मुलं परत द्या.. असा आक्रोश करणाऱ्या देबिकाला मुलं तर मिळत नाहीत, मात्र आई म्हणून ती कशी वाईट आहे? तिची मानसिक स्थिती कशी योग्य नाही, ती वेडी आहे अशा किती तरी गोष्टींचा भडिमार तिच्यावर केला जातो. नॉर्वेसारख्या ठिकाणी नागरिकत्व मिळवून स्थायिक होण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या अनिरुद्धलाही देबिकाच्या भावनांशी देणेघेणे नाही, त्यामुळे या लढाईत एकाकी पडलेली देबिका कधी आक्रोश करते, कधी मुलांना तिथून हर प्रकारे काढण्याचा प्रयत्न करते, तर कधी थेट भारतीय मंत्र्यांच्या कार्यक्रमात जाऊन आवाहन करते. अर्थात, देबिकाचा हा संघर्ष सोपा नव्हता. परदेशातील माणसांकडूनच नव्हे तर आपल्याच माणसांकडूनही फसवल्या गेलेल्या देबिकाची मुलांना परत मिळवण्याची जिद्द दाखवणं हा एकच या चित्रपटामागचा दिग्दर्शिकेचा हेतू नाही. तिने या वास्तव कथेला कोणताही अतिरंजित भावनिक नाटय़ाचा मुलामा दिलेला नाही, मात्र घटनांमधूनच बरंच काही सांगण्याचा तिचा प्रयत्न किती यशस्वी ठरला हे सांगणंही कठीण आहे.

‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ हा चित्रपट सागरिका चक्रवर्ती यांच्या आयुष्यात घडलेल्या वास्तव घटनेवर आधारित आहे. अशा प्रकारचा संघर्ष पडद्यावर येताना अनेकदा चित्रपटाचं आशयमूल्य वाढवण्यासाठी वा तो अधिक खिळवून ठेवण्यासाठी पदरच्या काही गोष्टी, पैलू कथेत पेरले जातात. अशिमा यांनी या चित्रपटात ती कोणतीही गोष्ट करण्याचं टाळलं आहे. त्यामुळे राणी मुखर्जीसारखी वलयांकित अभिनेत्री असतानाही ओढूनताणून नायिकाप्रधान चित्रपट करण्याचा प्रयत्न यात नाही. त्यामुळेच असेल कदाचित तो अधिक सोपा वाटतो आणि थेट मनाला भिडतो. हा चित्रपट म्हणजे निव्वळ संघर्षकथा नाही. भारतीय कुटुंबव्यवस्थेच्या नावाखाली बाहेर जाऊन कुटुंबाचे आर्थिक पोषण करणं हीच फक्त पुरुषाची जबाबदारी आणि घरात चूल-मूल सांभाळणं ही स्त्रीची जबाबदारी या कल्पना अजूनही किती घट्ट धरून ठेवलेल्या आहेत; किंबहुना मुरलेल्या आहेत, की यात आपण काही तरी चुकीचं करतो आहोत ही जाणीवच अनेकांना होत नाही. पत्नीला सन्मानाने वागवणं हे जाणिवेतच नाही तर ते नेणिवेत कुठून येणार? अशिमा छिब्बर यांनी अशा किती तरी विसंगतींवर बोट ठेवलं आहे. परदेशातील व्यवस्थेविरुद्ध कायदेशीर लढाई जिंकून आपल्या मुलांना परत मिळवणारी स्त्री घरच्यांच्या कारवायांपुढे पार हरते. तिला ही लढाई जिंकूनच आपलं अस्तित्व सिद्ध करावं लागतं. मुळात आपल्याला जे योग्य वाटतं आहे त्यासाठी शेवटपर्यंत लढत राहणं, संकटातही टिकून राहणं हे महत्त्वाचं आहे. देबिकाचा लढा त्या दृष्टीने खूप काही सांगू पाहणारा आहे. राणी मुखर्जीने याआधीही अशा भूमिका सहज अभिनयाच्या जोरावर पेलल्या आहेत. अर्थात, इथे तिची परीक्षा अधिक होती, कारण कुठल्याही बाह्य नाटय़ाचा आधार न घेता अभिनयातून देबिकाची ताकद पोहोचवणं हे आव्हान तिच्यासमोर होतं. ते तिने तिच्या परीने पेललं आहे. मात्र या चित्रपटाच्या बाबतीत दिग्दर्शिका अशिमा छिब्बर यांचा दृष्टिकोन आणि त्यांची मांडणी अधिक प्रभावी ठरली आहे यात शंका नाही.

मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे

दिग्दर्शिका – अशिमा छिब्बर

कलाकार – राणी मुखर्जी, अनिर्बन भट्टाचार्य, नीना गुप्ता, जिम सारभ.