भारतीय संस्कृतीमध्ये देवदेवतांच्या पूजेला आणि त्यांच्या उपासनेला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. विविधतेत एकता असणाऱ्या भारत देशाची हिच पाळेमुळे आता संपूर्ण जगात पसरत आहेत ही बाब नाकारता येणार नाही. भारतीय संस्कृतीमुळे प्रभावित होऊन अनेक परदेशी नागरिकांनीही भारतातच स्थिरावण्याचा किंवा मग भारतात येऊन येथील संस्कृतीचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतल्याचे आपण आजवर पाहिले असेल. अशा या भारतीय संस्कृतीची भुरळ आणखी एका प्रसिद्ध इंग्रजी गायिकेला पडली आहे. मायली सायरस या प्रसिद्ध गायिकेने नुकतेच कॅलिफोर्नियातील तिच्या मॅलिबू येथील घरी लक्ष्मी पूजेचे आयोजन करत देवी लक्ष्मीची उपासना केली.

मायलीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेले फोटो सध्या अनेकांचेच लक्ष वेधत आहेत. या फोटोंमध्ये मायलीच्या घरात असलेला लक्ष्मीपूजेचा थाट पाहायला मिळत आहे. या फोटोंमध्ये मायलीने अगदी रितसर पद्धतीने लक्ष्मीपूजेची मांडणी केल्याचे पाहायला मिळत आहे. धनधान्य-संपत्तीची देवता असणाऱ्या लक्ष्मी देवीच्या फोटोसोबतच मायलीने पूजेसाठी तिच्या धार्मिक गुरुंचाही फोटो शेजारी ठेवल्याचे पाहायला मिळत आहे. प्रसादापासून ते अगदी फळांच्या परडीपर्यंत सर्व गोष्टींची नीट मांडणी करत मायलीने लक्ष्मीपूजा केल्याचे दिसते.

https://www.instagram.com/p/BQJ-83jBZ2O/

https://www.instagram.com/p/BQJpxI2hXAu/

सगळी अमेरिका जेव्हा ‘सुपर बोल’ पाहण्यात दंग होती तेव्हा मायली सायरस तिच्या घरी लक्ष्मी पूजा करण्यात मग्न होती हे तिने तिच्या कॅप्शनमधूनही सांगितले आहे. फोटोला कॅप्शन देताना मायलीने लिहिले की, ‘सुपर बॉऊलऐवजी मी ‘फ्रुट बोल’ला प्राधान्य दिले.’ मायलीने शेअर केलेल्या दुसऱ्या एका फोटोमध्ये तिच्या घरातील सुरेख सजावटही पाहण्यास मिळते. ज्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या आणि सुरेख बैठकव्यवस्थेने घराचे सुशोभिकरण केल्याचे दिसते. मायलीने अचानक ही पूजा करण्याचा बेत का केला हे मात्र अद्यापही कळू शकलेले नाही. मायलीला हिंदू धर्माबद्दल प्रचंड आकर्षण असल्याचे याआधीही तिच्या सोशल नेटवर्किंग साइट्सवरील पोस्ट्सद्वारे पाहायला मिळाले होते. त्यामुळे सध्या मायली चर्चेत आहे ते म्हणजे तिच्या या अनोख्या लक्ष्मीपूजनामुळे.