विविध अभ्यासपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या विद्या बालनचा शकुंतला देवी हा चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला. प्रसिद्ध गणितज्ञ शकुंतला देवी यांच्या जीवनावर आधारित हा बायोपिक असून यात त्यांच्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा झाला. विशेष म्हणजे त्या प्रसिद्ध गणितज्ञ असण्यासोबतच बऱ्याच वेळा एखाद्या गोष्टीचं भाकित करायच्या आणि ते खरं ठरायचं असं त्यांच्या जावयाचं मत आहे. इतकंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयीदेखील त्यांनी एक भाकित केलं होतं असं ‘फर्स्ट पोस्ट’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

शकुंतला देवी एक गणितज्ञच असण्यासोबतच एक उत्तम लेखिका, व्यावसायिक, राजकारणी होत्या. त्यामुळे त्यांच्या जावयाने अजय अभय कुमारने त्यांच्याविषयी एका लेखात लिहिलं आहे. २०१३ मध्ये अखेरचा श्वास घेणाऱ्या शकुंतला देवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी एक भाकित केलं होतं. विशेष म्हणजे हे भाकित योगायोगाने खरं ठरलं. एक दिवसी नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होतील असं शकुंतला देवी म्हणाल्या होत्या आणि अगदी तसंच घडलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले. परंतु, हे पाहायला शकुंतला देवी हयात नव्हत्या.

शकुंतला देवी यांनी त्यांच्या निधनाविषयीदेखील भाकित केलं होतं. फेब्रुवारी २०१३ मध्ये शकुंतला देवी लंडनमध्ये येणार होत्या. त्यांनी अनुपमाला म्हणजेच त्यांच्या मुलीला भेटायची इच्छा होती. परंतु, त्यांची प्रकृती त्यांनी साथ देत नव्हती. त्यामुळे आम्ही जून महिन्यात तुम्हाला भेटाला येतो असं सांगितलं. त्याचवेळी मी तोपर्यंत या जगात नसेन असं त्या म्हणाल्या होत्या आणि त्यांचं वाक्य खरं ठरलं त्या २१ एप्रिल २०१३ मध्ये हे जग सोडून गेल्या.