हिंदी चित्रपटांमध्ये गेल्या काही वर्षांत आशय, मांडणीच्या दृष्टीने अनेकविध प्रयोग होत आहेत. पूर्वी जो केवळ मसालापट, बिग बजेट चित्रपटांच्या यशाचा सिलसिला होता तो कुठे तरी मंदावला आहे. त्याऐवजी देशातल्या कानाकोपऱ्यांतील गावखेडय़ाची, इथल्या मातीची कथा पाहायला प्रेक्षक गर्दी करतात. अशा वेळी हातातील मोबाइलवर जगभरातील चित्रपट अनुभवणाऱ्या प्रेक्षकांचा विचार करता आपल्या आशयमांडणीत फरक केला जातो आहे का? जागतिक चित्रपटांच्या तोडीचे चित्रपट असावेत, यासाठी तथाकथित साचेबद्ध हिंदी चित्रपट बदलतो आहे का, असा प्रश्न लेखक, दिग्दर्शक, अभिनेता अशा विविध भूमिकांमधून वावरणाऱ्या फरहान अख्तरला विचारला गेला. आणि त्यावर क्षणाचाही विलंब न करता आपण जागतिक सिनेमाने इतके पछाडलेलो का आहोत, असा उलट सवाल करत फरहानने इथला चित्रपट हा इथल्या मातीतलाच असायला हवा, असं आग्रही मत व्यक्त केलं.
गेले कित्येक महिने चित्रपटांपासून दूर असलेला फरहान अख्तर ‘स्काय इज पिंक’ या शोनाली बोस दिग्दर्शित चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. निरेन आणि आदिती चौधरी या जोडप्याच्या पंचवीस वर्षांच्या आयुष्याची कथा, त्यांचा खरा संघर्ष मांडणारा हा वास्तव कथेवर आधारित असा चित्रपट आहे. या चित्रपटाचा प्रीमिअर टोरांटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात करण्यात आला. गेल्या काही वर्षांत भारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमधून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मात्र मुळात तुमचे चित्रपट, तुमचा कथाविषय चांगला असेल तर त्याच्याशी कुठलाही प्रेक्षक जोडला जाऊ शकतो. आणि प्रेक्षक चित्रपटाशी जोडला गेला तरच चित्रपट यशस्वी ठरतो, असे फरहानने सांगितले. जागतिक स्तरावर हिंदी चित्रपट पोहोचावेत यासाठी त्यांनी पाश्चिमात्य धाटणी स्वीकारण्याची अजिबात गरज नाही. हिंदी चित्रपटांमध्ये नाचगाणी हा अविभाज्य भाग राहिलेला आहे. इथला एक मोठा प्रेक्षकवर्ग या नाचगाण्यांच्या चित्रपटांशी जोडला गेलेला आहे. नाचगाणी असलेले चित्रपट वाईट आणि नसलेले चित्रपट चांगले हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला नाही. आपण जसा आपला चित्रपट आहे त्याच पद्धतीने जपला पाहिजे, असे फरहानने सांगितले.
फरहान या चित्रपटात पहिल्यांदाच दोन मुलांच्या वडिलांची भूमिका करतो आहे. निरेन आणि आदिती या जोडप्याची मुलगी आएशा ही जन्मापासून दुर्धर आजाराने ग्रस्त होती. ती काही महिने किंवा काही वर्ष तुमच्याबरोबर असेल, असे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर या जोडप्याने घेतलेला निर्णय, आएशाच्या आयुष्यात आनंद आणण्यासाठी केलेले प्रयत्न, संघर्ष हे सगळं या चित्रपटातून मांडण्यात आलं आहे. आजपर्यंत मी अशी भूमिका केलेली नव्हती, असं फरहान म्हणतो. अत्यंत भावनिक अशी गोष्ट मांडणारा हा चित्रपट आहे, आणि त्यातूनही तो आता जिवंत असलेल्या लोकांची गोष्ट सांगतो आहे. त्यामुळे या चित्रपटातील आव्हान वेगळं होतं, असं त्याने सांगितलं. अर्थात, ही निरेन आणि आदिती काय मानसिक खळबळीतून गेले असतील, याची मी कल्पना करू शकतो. तुमचं नुकतंच जन्मलेलं बाळ काही महिन्यांचं सोबती आहे इतकंच नाही त्याला जिवंत ठेवण्यासाठी खूप उपचार-सायास करावे लागणार आहेत, हे सांगितल्यानंतर त्या आई-वडिलांचं काय झालं असेल? मला दोन मुली आहेत, माझं त्यांच्यावर अतोनात प्रेम आहे, मला डॉक्टरनी असं काही सांगितलं असतं तर मी ते सहनच करू शकलो नसतो, अशी भावना फरहानने व्यक्त केली. इथे या जोडप्याने त्यांची परिस्थितीही बेताचीच असताना हेही आव्हान पेललं आणि आज त्यांची मुलगी-मुलगा दोघंही या जगात नसतानाही ते दोघं त्याच हिंमतीने आयुष्य जगत आहेत. ही गोष्टच प्रेरणादायी होती, असं त्याने सांगितलं.
या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनास, झायरा वासिमसारखी उत्तम अभिनेत्री, रोहितसारखा नवीन पण हुशार कलाकार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शोनाली बोस यांच्यासारखी दिग्दर्शिका असं सगळं छान जुळून आलं होतं, असं फरहान म्हणतो. शोनाली खूप संवेदनशील, प्रतिभावान दिग्दर्शिका आहे. या चित्रपटाबद्दल एक विचित्र योग आहे, असं त्याने सांगितलं. शोनाली नेहमीच संकेतांविषयी बोलतात, अर्थात मला याची माहिती त्यांना भेटल्यावरच समजली. पण त्यांनी ‘मार्गारेट विथ स्ट्रॉ’ हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. माझी मैत्रीण अभिनेत्री कलकी हिचा एक चांगला चित्रपट असूनही काही कोरणांनी मी तो पाहू शकलो नव्हतो. एकदा घरी एकटाच असताना मी हा चित्रपट पाहिला आणि किती तरी वेळ ढसाढसा रडत बसलो होतो. त्यानंतर अगदी सात-आठ दिवसांनी मला निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर यांचा फोन आला की आपल्याला अमुक एक चित्रपट करायचा आहे आणि त्याचे दिग्दर्शन शोनाली बोस करणार आहेत. माझ्यासाठी हे शुभसंकेताहून कमी नव्हतं, असं तो म्हणतो.
वास्तव विषयांवरच्या चित्रपटांना आपल्याकडे खूप मर्यादा येतात, हे तो मान्य करतो. मात्र वास्तव विषयांचे चित्रपट करताना ते जबाबदारीच्या भावनेतूनच केले पाहिजे, असं तो सांगतो. तुमचे चित्रपट अगदी अचूक बनतील, असे नाही. ते कधी तरी चांगले बनतात, कधी नाही बनत. मात्र ते वास्तवतेशी जोडून घेणारे असले पाहिजेत, असे त्याने स्पष्ट केले. वास्तव कथांवरच आधारित चित्रपट असण्याची गरज नाही, हे सांगताना त्याने ‘बाहुबली’ चित्रपटाचे उदाहरण दिले. हा चित्रपट पूर्ण काल्पनिक कथेवर आधारित होता, मात्र तो लोकांना आपलासा वाटला. त्यामुळे प्रेक्षक त्याच्याशी जोडले गेले पाहिजेत, अन्यथा तांत्रिकदृष्टय़ा उत्तम चित्रपट हा कोरडाच वाटतो, असं त्याने सांगितलं.
फरहान मुळातच अष्टपैलू कलाकार आहे, याबद्दल बोलताना आपल्याला जे चांगलं वाटतं आणि त्या क्षणी ज्या कामातून सर्जनशील समाधान मिळतं ते प्राधान्याने करत असल्याचं तो म्हणतो. सध्या प्रेक्षकांचा हिंदी चित्रपटांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे आणि त्यामुळे दर्जेदार आशय असलेल्या चित्रपटांना चांगला वाव मिळतो आहे, याबद्दल आनंद व्यक्त करतानाच चित्रपटकर्मीना आपल्याला पूर्णपणे मनोरंजन म्हणजे काय? हे समजलं आहे या भ्रमात राहू नये, असा मोलाचा सल्लाही दिला. प्रेक्षकांचा कल, त्यांचे विचार नेहमी बदलत असतात. तसाच आजूबाजूचा समाज, परिस्थितीही बदलत असते. निर्माता-दिग्दर्शक-कलाकार या कुठल्याही भूमिकेतून हा बदल अनुभवत चित्रपट माध्यमात नवं काही शिकण्याचा ध्यासच आपल्याला पुढे घेऊन जात असल्याचेही फरहानने सांगितले.
सध्या जागतिक चित्रपटांचे इतके वेड आहे की आपला चित्रपटही त्यांच्या चित्रपटांप्रमाणे असावा, असा दुराग्रह धरला जातो. सतत जग आपल्या चित्रपटांबद्दल काय बोलते आहे, याचा विचार का करावा? प्रेक्षक असोत वा चित्रपटकर्मी त्यांनी आपल्या माणसांना आपल्या चित्रपटाबद्दल काय वाटते, याचा विचार केला पाहिजे. आपण आपल्या पद्धतीने चित्रपटातून जे मांडले आहे ते जगभरातील लोकांना आवडले तर ते त्यातून त्यांना जे घ्यायचे आहे ते घेतील. नाहीतर सोडून देतील, सतत जागतिक सिनेमाशी हिंदी चित्रपटांची केली जाणारी तुलना चुकीची आहे.
फरहान अख्तर