नेहमीच विविध विषयांचं महत्त्व आणि त्या दिवसाचा दिनविशेष ओळखत गुगल डूडलच्या माध्यमातून त्यासंबंधीची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवत असतं. मुख्य म्हणजे गुगलच्या या डूडलचं अनेकांनाच कुतूहल वाटतं. फादर्स डे पासून, पंचम दांच्या वाढदिवसापर्यंत प्रत्येक दिवसाचं महत्त्वं गुगलनेही जाणलं आहे. असं हे कलात्मक डूडल नाचताना तुम्ही कधी पाहिलं आहे का? गुगलचं नवं डूडल अगदी तसेच आहे. प्रत्येकाला आपल्या तालावर ठेका धरायला भाग पाडणाऱ्या ‘हिप- हॉप’ या संगीतप्रकाराची सुरुवात होऊन तब्बल ४४ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गुगलचं हे नवं डूडल साकारण्यात आलं आहे.

एकंदर हे डूडल पाहता, गुगलही ‘हिप- हॉप’च्या तालावर डुलत आहे असंच म्हणावं लागेल. गुगलच्या विंडोवर गेल्यानंतर तुम्ही डूडलवर क्लिक करताच एक यो स्टाइलचा माणूस येऊन हिप हॉप संगीतातील ‘ब्रेक’ प्रकाराची सुरुवात कधीपासून झाली याची माहिती देतो. ही माहिती देण्याची अनोखी शैलीसुद्धा चर्चेचा विषय ठरत आहे. कारण, ती एखाद्या रॅप साँगप्रमाणेच असून, आपल्याला एका वेगळ्याच दुनियेत नेत आहे.

वाचा : ‘चक दे! इंडिया’विषयी या गोष्टी तुम्हाला माहितीयेत का?

११ ऑगस्ट, १९७३ मध्ये ‘हिप हॉप’ संगीत प्रकारात ‘ब्रेक’ ही नवीन संकल्पना उदयास आली. कूर हर्क नावाच्या डीजेने संगीताच्या परिभाषाच बदलल्या. तेव्हापासूनच ‘हिप- हॉप’चं प्रस्थ वाढलं आणि त्याला अनेकांनीच पाठिंबा दिला. मुख्य म्हणजे चित्रपट किंवा म्युझिक व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या ‘डीजे’प्रमाणे आपणही त्या पॅनलच्या मागे उभं राहून, कानाला हेडफोन लावून आपल्याच तंद्रीत गुंग होण्याचं स्वप्न अनेकांनीच पाहिलं असेल. तर अशा मंडळींसाठी तर हे डूडल जास्तच खास आहे. कारण, यामध्ये तुम्हाला स्वत:चा म्युझिक ट्रॅकही बनवता येतोय, डिस्क बदलता येतेय आणि ती स्क्रॅच करत ‘तो’ विवित्र आवाजही काढता येत आहे. मग वाट कसली पाहताय? उचला ते हेडफोन आणि दाखवून द्या ‘डीजे’इंगचं तुमचं कौशल्य.