अभिनेता अनिल कपूर आणि हर्षवर्धन कपूर या बापलेकांच्या जोडगोळीला एकत्र काम करताना पाहण्याची संधी देणारा चित्रपट म्हणून ‘थार’चा उल्लेख महत्त्वाचा ठरतो. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात राजस्थानमधील एका छोटय़ाशा गावात घडणारे कथानक दाखवण्यात आले आहे. एरव्ही शांत असणाऱ्या या गावात एका हत्येचा तपास सुरू होतो. या खुनाचं गूढ आपण उकलून काढू शकलो तर पोलीस अधिकारी म्हणून आपल्या हातून काहीतरी चमकदार कामगिरी होईल, अशी आस त्या गावचा पोलीस असलेल्या अनिल कपूर यांच्या मनात असते. त्याच वेळी जुन्या-पुराण्या वस्तू शोधून त्यांची विक्री करणारा एक तरुण या पोलिसाच्या नजरेत येतो. या तरुणाचा यात काही सहभाग असावा, अशी शंका पोलिसाच्या मनात दाटते आणि मग शह – काटशहाचा एक वेगळाच खेळ रंगतो. यात आणखी एक जोडी पुन्हा इतक्या वर्षांनी एकत्र पाहायला मिळणार आहे. ती म्हणजे अनिल कपूर आणि सतीश कौशिक यांची.. या दोघांनी कितीतरी चित्रपटांतून एकत्र काम केले आहे. ‘थार’मध्ये दोघेही पोलिसांच्या भूमिकेत आहेत. अभिनेत्री फातिमा सना शेखचीही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. या चित्रपटाचे कथा-पटकथा लेखन आणि दिग्दर्शन राज सिंग चौधरी यांचे आहे. तर संवादलेखन दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी केले आहे.

कलाकार –  अनिल कपूर, हर्षवर्धन कपूर, फातिमा सना शेख, सतीश कौशिक, राहुल सिंग, संजय बिष्णोई आणि संजय दधीच.  कधी –  प्रदर्शित  कुठे – नेटफ्लिक्स

द वाइल्ड्स (सीझन २)

एकीकडे नेटफ्लिक्सवर गाजलेल्या ‘स्ट्रेंजर थिंग्ज’ या कुमारवयीन मुलांवर बेतलेल्या वेबमालिकेच्या चौथ्या पर्वाची उत्सुकतेने वाट पाहिली जात असताना आणखी एक कुमारवयीन मुलांभोवती गुंफलेल्या वेबमालिकेचे नवे पर्व ‘अ‍ॅमेझॉन प्राइम’वर दाखल झाले आहे. ‘द वाइल्ड्स’ ही अमेरिकन वेबमालिका २०२० मध्ये अ‍ॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाली होती. काही महाविद्यालयीन मुलींचा चमू विमान अपघातामुळे एका वैराण बेटावर अडकतो. हवाई येथे एका मोठय़ा कार्यक्रमासाठी निघालेल्या या मुलींचे विमान दुर्घटनाग्रस्त होते आणि मग निर्जन अशा बेटावर जगण्याची त्यांची कसरत सुरू होते. अर्थात हा फक्त अपघात नसून हा सुनियोजित कट आहे आणि आपल्यावर काही कॅमेरे लक्ष ठेवून आहेत, याची मुलींना कल्पनाही नसते. ही पहिली वेबमालिका लोकप्रिय झाली, त्यामुळे या वेबमालिकेचे दुसरे पर्व आणण्याचा घाट घातला गेला. या पर्वात हे नाटय़ अधिकच गडद करण्यात आले आहे. इथे अशाच काही मुलांचा चमू बेटावर अडकलेला दिसतो. तेही अशाच कुठल्यातरी कटाचे शिकार आहेत का?, याचं उत्तर देणारे ‘द वाइल्ड्स’चे दुसरे पर्वही तितकेच रंजक असेल असा दावा मालिकेच्या निर्मात्यांनी केला आहे. आठ भागांच्या या दुसऱ्या पर्वालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

कलाकार –  चार्ल्स अ‍ॅलेक्झ्ॉन्डर, सोफिया अली, श्ॉनन बेरी, रेन एडवर्डस, रीड श्ॉनन, हेलेना हॉवर्ड   कधी – प्रदर्शित   कुठे – अ‍ॅमेझॉन प्राइम

पेट पुराण

‘पेट पुराण’.. नावावरून ही वेबमालिका खाण्याशी संबंधित कोणत्या विषयावर असेल असं वाटत असलं तरी प्रत्यक्षात ती सध्या चर्चेत असलेल्या पेट्सवर अर्थात पाळीव प्राण्यांवरती आधारलेली आहे. ज्ञानेश झोटिंग लिखित आणि दिग्दर्शित ही वेबमालिका सध्या अनेकांचं लक्ष वेधून घेते आहे ते त्याच्या विषयामुळे.. मूल होत नाही म्हणून नातेवाईकांपासून मित्रमंडळींपर्यंत अनेकांचे टोमणे, टीका ऐकत मूग गिळून गप्प बसलेलं एक दाम्पत्य आपल्या परीने यावर उत्तर शोधून काढतं. एखादा पाळीव प्राणी दत्तक घेऊन त्याचे आईवडील व्हायचं असा निर्णय नायक-नायिका घेतात. आणि मग तिथूनच एका वेगळय़ा गमतीदार प्रवासाची सुरुवात होते. आईवडील होणं मुळात कधीच सोपं नसतं. मग ते एखादं छोटं पिल्लू का असेना.. त्याला समजून घेण्यापासून अनेक गोष्टी निगुतीने कराव्या लागतात. याची गंमतजंमत या ‘पेट पुराण’ नामक वेबमालिकेतून उलगडून दाखवण्यात आली आहे.

कलाकार –  सई ताम्हणकर, ललित प्रभाकर.  कधी –  प्रदर्शित  कुठे –  सोनी लिव्ह