Suriya Karuppu Movie Teaser : दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्या आज त्याचा ५० वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त आगामी चित्रपट ‘करुप्पू’चा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरमधून सूर्याचा अॅक्शनने भरलेला हटके आणि रावडी अंदाज पाहायला मिळत आहे. त्याचा हा अंदाज चाहत्यांच्याही चांगलाच पसंतीस पडला आहे.
‘करुप्पू’ हा एक अॅक्शन-थ्रिलर चित्रपट असून चित्रपटाचं दिग्दर्शन आरजे बालाजी यांनी केले आहे. “सूर्या सरांच्या खास दिवशी ‘करुप्पू’चा टीझर सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे” असं म्हणत सर्व सोशल मीडिया अकाऊंटद्वारे हा टीझर शेअर करण्यात आला आहे.
गावात जत्रा सुरू आहे आणि वातावरणात एक वेगळीच ऊर्जा असल्याचं या टीझरमधून दिसत आहे. तर टीझरच्या सुरुवातीलाच सूर्याच्या व्यक्तिरेखेची झलक दिसत आहे. त्याचबरोबर टीझरमधून स्थानिक देवतेची पूजा, परंपरा आणि लोकसंस्कृतीचं चित्रणदेखील दिसत आहे.
टीझरमध्ये सूर्या दोन वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसत आहे. एका अवतारात तो वकील असून स्वतःचं नाव सरवनन सांगतो. तर दुसऱ्या रूपात तो ग्रामीण पोशाखात दिसत असून त्याच्या हातात एक शस्त्र असल्याचं पाहायला मिळत आहे.
अभिनेता सूर्या इन्स्टाग्राम पोस्ट
या टीझरमधून अनेक अॅक्शन सीन्स, उत्तम संवाद आणि सूर्याचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळत आहे. ज्यामुळे त्याच्या चाहत्यांची चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. ‘करुप्पू’विषयी सांगायचं झालं तर याचं दिग्दर्शन आरजे बालाजी यांनी केलं आहे. कथा अश्विन रविचंद्रन, राहुल राज, टी.एस. गोपी कृष्णन आणि करण अरविंद कुमार यांची आहे. तर चित्रपटाला संगीत साई अभयंकर यांनी दिलं आहे.
‘करुप्पू’मध्ये सूर्याबरोबर त्रिशा कृष्णन मुख्य भूमिकेत आहे. याआधीही या जोडीने ‘आरु’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या दोघांमशिवाय इंद्रन्स (मलयाळम अभिनेता), शिवदा, स्वासिका, योगी बाबू आणि नटराजन सुब्रमण्यम यांसारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. ‘करुप्पू’ हा चित्रपट दिवाळी २०२५ मध्ये प्रदर्शित होणार असल्याची शक्यता आहे.