दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थ याने भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. आपल्याला शिव्यांचे फोन तसंच जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचा आरोपही त्याने केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्याने हे सांगितलं आहे.

आपल्या ट्विटमध्ये तो म्हणतो, “भाजपा सदस्याने माझा फोन नंबर लीक केला होता. गेल्या २४ तासात मला आणि माझ्या परिवाराला ५००हून अधिक बलात्काराच्या आणि मारुन टाकण्याच्या धमक्या आल्या आहेत. सगळे नंबर त्यांच्या भाजपा कनेक्शन आणि डीपीसहीत मी रेकॉर्ड करुन ठेवले आहेत आणि आता ते पोलिसांकडे देत आहे. मी शांत बसणार नाही. तुम्ही प्रयत्न करत राहा”.

या त्याच्या ट्विटमध्ये त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनाही टॅग केलेलं आहे.

त्याच्या या ट्विटला अनेकांनी रिट्विट केलं असून अनेक कलाकारांनी त्याला पाठिंबा दर्शवला आहे. अभिनेत्री अदिती राव हैदरी, श्रेया धन्वंतरी यांनी त्याच्या या ट्विटवर त्याला पाठिंबा देणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत. त्याचं हे ट्विट सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.