दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे आणि ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले आहे. हैदराबाद येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या बातमीनं चाहते आणि सिनेसृष्टीतील अनेक कलाकार हळहळ व्यक्त करत आहेत.

अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांनी गेली चार दशकं आपल्या अभिनयातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. विशेष म्हणजे त्यांनी पडद्यावर साकारलेला खलनायक प्रेक्षकांच्या कायमच स्मरणात राहील. कोटा श्रीनिवास राव यांनी ७५० हून अधिक तेलुगू, तमीळ, कन्नड व हिंदी चित्रपटांमध्ये काम केले.

१९७८ मध्ये आलेल्या ‘प्राणम् खारीदू’ या तेलुगू चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यानंतर ‘शिवा’, ‘गायम’, ‘मनी’, ‘सत्रुवु’, ‘आहा ना पेल्लंता’, ‘बोम्मरिल्लु’, ‘अथाडु’, ‘रक्त चरित्र’, ‘लीडर’, ‘सन् ऑफ सत्यामूर्ती’ या आणि अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. अशा या हरहुन्नरी अभिनेत्यानं जगाचा निरोप घेतला आहे.

त्यांच्या निधनानंतर अनेक चाहते, कलाकार आणि राजकीय नेत्यांनी त्यांना सोशल मीडियावरून श्रद्धांजली अर्पण केली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर)वर लिहिलं, “ज्येष्ठ अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांनी चित्रपट व रंगभूमी क्षेत्रात दिलेलं योगदान कायम लक्षात राहील.”

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांची एक्स पोस्ट

अभिनेता रवी तेजा यांनीही श्रद्धांजली अर्पण करत, “लहानपणापासून त्यांचा अभिनय पाहत आलो, त्यांच्यापासून खूप काही शिकायला मिळालं. ते माझ्यासाठी कुटुंबासारखे होते. त्यांच्याबरोबर काम केल्याच्या अनेक सुंदर आठवणी आहेत. कोटा श्रीनिवास राव, आपल्या आत्म्यास शांती लाभो. ओम शांती” असं त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर अनेक चाहत्यांनीसुद्धा त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, २०१५ साली भारत सरकारनं त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवलं होतं. तसेच आंध्र प्रदेश सरकारकडून दिला जाणारा प्रतिष्ठित नंदी पुरस्कार त्यांनी नऊ वेळा मिळवला होता. अभिनयाबरोबरच ते राजकारणातही सक्रिय होते. १९९९ मध्ये त्यांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश केला होता, त्यानंतर २००४ पर्यंत त्यांनी विजयवाडा मतदारसंघाचे आमदार म्हणून काम केलं होतं.