प्लास्टिक बंदी निर्णयाबाबत जनजागृती करण्यासाठी राज्य सरकार ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून ‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता सिद्धार्थ जाधवची निवड करणार आहे. राज्यात सरसकट प्लास्टिक बंदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, यासाठी कायद्यात सुधारणा केली जाणार आहे. पुढच्या वर्षी मार्च महिन्यापासून ही बंदी लागू करण्यात येणार आहे.

अधिकाधिक लोकांपर्यंत प्लास्टिक बंदीचा संदेश पोहोचावा, प्लास्टिकमुळे निर्माण होणारी पूरस्थिती आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम यासंदर्भात लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी ब्रँड अॅम्बेसेडरची भूमिका महत्त्वाची आहे, असे पर्यावरण विभागाचे अधिकारी म्हणाले. यासाठी रिंकू राजगुरू आणि सिद्धार्थ जाधवसोबतच बॉलिवूड कलाकाराचाही विचार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

‘ग्रामीण भागातील लोकांपर्यंत संदेश पोहोचवण्यात मराठी कलाकार मदत करतील तर शहरी भागातील लोकांसाठी इतरांची निवड करण्यात येईल. एकूण पाच ब्रँड अॅम्बेसेडर यासाठी निवडण्यात येतील. समाजाच्या विविध घटकांतील लोकांनीही प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा,’ असे पर्यावरण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सतीश गवई म्हणाले. पुढील १५ दिवसांत पाच अॅम्बेसेडर कोण असतील हे निश्चित करण्यात येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यात सध्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी आहे, पण राज्य शासनाने सरसकट प्लास्टिक बंदी करण्याचा निर्णय नुकताच घेतला. त्यासाठी कायद्यात सुधारणा, कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या हॉटेल्स आणि विक्रेत्यांवर फौजदारी कारवाईची तरतूद, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना तीन ते सहा महिने शिक्षा आणि परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे.