जबरदस्त कथानक, धमाकेदार स्टंट आणि विनोदाच्या तडक्याचे मिश्रण असलेल्या अॅक्शन पटांनी लक्षवेधी प्रेक्षकवर्ग गोळा केला आहे. त्यामुळेच की काय हॉलीवूडमध्ये तयार होणाऱ्या एकूण चित्रपटांपैकी जवळपास ६० टक्के चित्रपट हे अॅक्शनपट या श्रेणीत मोडतात. त्यातही सुपर हिरो पटांचा सिंहाचा वाटा आहे. सिक्वल आणि प्रिक्वलमध्ये खेळणाऱ्या या सुपर हिरोंनी प्रेक्षकांना एका आभासी जगात नेऊन सोडले आहे. परंतु, हिरोंना सुपर हिरोत्व प्राप्त करून देणे हे दिसते तितके सोपे नसते. ते काम पडद्यामागे अनेक स्टंटमन करत असतात. अत्यंत जिकिरीच्या असलेल्या या कामात अनेक अपघात घडतात. काहींना त्यात जीवही गमवावा लागतो. आजवर विक मॉरो, ब्रँडन ली, रॉय किनिअर, डेव्हिड रिची, हॅरी कॉनर यांच्यासारख्या कित्येक स्टंटवीरांनी चित्रीकरणादरम्यान आपले प्राण गमावले आहेत. या यादीत आता एस. जे. हॅरिस या नावाची भर पडली आहे. माव्र्हल सुपर हिरो ‘डेडपूल -२’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान झालेल्या मोटारसायकल अपघातात एस. जे. हॅरिस या ४० वर्षीय स्टंटवुमनला आपला जीव गमवावा लागला आहे. आजवर शेकडो स्टंट करणाऱ्या हॅरिसच्या अपघाती मृत्यूमुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. तसेच अनेकांनी समाजमाध्यमांवर आपले दु:ख व्यक्त केले. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून एका विशेष पथकाद्वारे अपघाताची तपासणी सुरू आहे. अपघातग्रस्त मोटारसायकल वैद्यकीय चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आली असून सदर जागा पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतली आहे. एका विशिष्ट कामात तज्ज्ञ असलेल्या व्यक्तीचा आपले नेहमीचेच कोम करताना मृत्यू होणे हे पोलिसांना संशयास्पद वाटते आहे. याशिवाय आजवर चित्रीकरणादरम्यान झालेले मृत्यू आणि या अपघातात कमालीची तफावत आहे. याआधीचे बरेचसे अपघात उंचावरून उडी मारताना केबल वायर तुटून झाले होते. परंतु, हा मोटारसायकल चालवताना झालेला अपघात आहे. शिवाय गाडीचा वेग सामान्य होता. दरम्यान अचानक झालेला तांत्रिक बिघाड आणि त्यानंतर झालेला विस्फोट या घटना चमत्कारिक आहेत असे पोलिसांचे मत आहे. त्यामुळे सदर प्रकरणाची कसून तपासणी सुरू आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th Aug 2017 रोजी प्रकाशित
स्टंटवुमनचा अपघाती मृत्यू
अत्यंत जिकिरीच्या या कामात काहींना जीवही गमवावा लागतो
Written by मंदार गुरव

First published on: 27-08-2017 at 02:10 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stuntwomans death on deadpool 2 set hollywood katta part