काही दिवसांपूर्वी अभिनेत्री स्पृहा जोशीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये शुभारंभाचा नाट्यप्रयोग असं लिहिण्यात आलं होतं. त्यामुळे या लॉकडाउनच्या काळात पुन्हा एकदा नाट्यगृहांचे दरवाजे खुले होतात की काय असा प्रश्न नाट्यरसिकांना पडला होता. मात्र स्पृहाने केवळ व्हिडीओच शेअर केला होता. त्यामुळे हे नेमकं काय प्रकरण आहे हे चाहत्यांच्या लक्षात येत नव्हतं. परंतु, आता या व्हिडीओवरील पडदा दूर सारण्यात आला आहे.
हृषिकेश जोशी दिग्दर्शित ‘मोगरा’ हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या लॉकडाउनच्या काळात प्रेक्षकांचं मनोरंजन व्हावं आणि नाट्यरसिकांना नाटकाचा आस्वाद घेता यावा यासाठी ‘मोगरा’ हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नाटकाचे प्रयोग ऑनलाइन स्वरुपात होणार असल्यामुळे त्याला ‘नेटक’असंही संबोधण्यात येत आहे. हे नाटक १२ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दरम्यान, तेजस रानडे यांनी लिहिलेल्या या नाटकात अभिनेत्री स्पृहा जोशी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. अलिकडेच या नाटकाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे लॉकडाउनच्या या काळात अशाप्रकारे इंटरनेटवरून सादर होणाऱ्या या नाटकाबद्दल मराठी रसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता असल्याचं पाहायला मिळत आहे.