दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर आमिर खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ प्रदर्शित झाला. तगडी स्टारकास्ट, चित्रपटाचा मोठा बजेट, आमिर- अमिताभची जोडी अशा विविध कारणांमुळे या चित्रपटाकडून प्रेक्षकांना फार अपेक्षा होती. पण झालं ते उलटच. आमिर खानचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही आणि सोशल मीडियावर ट्रोलचा विषय ठरला. सोशल मीडियावर या चित्रपटावरून बरेच विनोदी, उपहासात्मक मीम्स व्हायरल झाले. आमिरच्या चित्रपटाची खिल्ली उडवणाऱ्यांवर अभिनेता सुनील शेट्टी भलताच नाराज झाला आहे. आमिरच्या बाजूने उभा राहत सुनील शेट्टीने ट्रोलर्सनाच सुनावलं आहे.

‘आजकाल प्रत्येकजण स्वत:ला चित्रपट समीक्षक समजत आहे. सोशल मीडियावर लोकांनी या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात ट्रोल केल्याने प्रेक्षकांनी दुसऱ्या दिवशी चित्रपटगृहांकडे पाठ फिरवली आहे,’ असं सुनील म्हणाला.

‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’बद्दल तो पुढे म्हणाला, ‘मी हा चित्रपट पाहिलेला नाही. पण माझ्या काही मित्रांनी हा चित्रपट पाहिला आणि तो त्यांना खूप आवडल्याचं सांगितलं आहे. कधी कधी आपण एखाद्या चित्रपटाकडून खूप जास्त अपेक्षा ठेवतो आणि आजकाल प्रत्येकजण स्वत:ला चित्रपट समीक्षक समजू लागला आहे. मनोरंजन क्षेत्राबाबत आपल्याला सर्वकाही माहीत आहे असं त्यांना वाटतं. परंतु प्रत्येक चित्रपटाला आपण योग्य पद्धतीने प्रदर्शित होऊ द्यायला थोडा वेळ द्यायला हवा असं मला वाटतं. त्यानंतर प्रेक्षकांनी त्यांचं मत मांडावं. आपण इतकी निंदा करू नये की चित्रपटाला थिएटरमधूनच काढलं जाईल.’

वाचा : ‘राजश्री प्रॉडक्शन’ घेऊन येत आहे ‘हम चार’ 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुनील शेट्टी यांच्यासोबतच अभिनेत्री अदिती राव हैदरीनेही ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ची पाठराखण केली आहे. ‘मी चित्रपट पाहिला आणि तो मला खूप आवडला. या चित्रपटाला इतकं ट्रोल का केलं जात आहे हेच मला समजत नाही,’ असं तिने ट्विटरवर म्हटलं.