सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकचाच ट्रेण्ड असल्याने एकामागोमाग एक असे बरेच बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘सुपर ३०’ या आयआयटी कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची जोरदार तयारी सुरू आहे. यामध्ये आनंद कुमार यांची भूमिका हृतिक रोशन साकारणार असून त्याचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे.

चित्रपटाचे नावसुद्धा ‘सुपर ३०’ असेच ठेवण्यात आले आहे. मंगळवारपासून वाराणसीमध्ये शूटिंगला सुरुवाती झाली असून विकास बहल याचे दिग्दर्शिन करत आहे. आनंद कुमार यांच्या भूमिकेला जवळून समजून घेण्यासाठी हृतिकने पाटणाच्या काही आयआयटी शिक्षकांचीही भेट घेतली आहे. पाटणा आणि वाराणसी येथे दहा- दहा दिवस आणि मुंबईतही चित्रपटाच्या बऱ्याच भागाचे शूटिंग होणार आहे.

काही दिवसांपूर्वी ‘सुपर ३०’च्या ३० विद्यार्थ्यांची भूमिका साकारणाऱ्यांचाही शोध सुरू होता. १५ ते १७ वयोगटाच्या जवळपास १५ हजार लोकांचे ऑडिशन्स घेण्यात आले होते. यामध्ये हृतिकसोबत मुख्य अभिनेत्री कोण असणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. २५ जानेवारी २०१९ रोजी ‘सुपर ३०’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.