Kamal Haasan on getting married twice : दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन त्यांचा आगामी सिनेमा ‘ठग लाइफ’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. चित्रपट ५ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. एका इव्हेंटमध्ये कमल हासन यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. तसेच दोन लग्न करण्याबाबत मत व्यक्त केलं.
‘ठग लाइफ’ मध्ये अभिनेत्री त्रिशा कृष्णन देखील आहे. इव्हेंटमध्ये एका पत्रकाराने त्रिशाला लग्नाबद्दल विचारलं. त्यावर तिने अविवाहित राहण्याच्या तिच्या निर्णयावर उत्तर दिले. लग्न झालं तरी ठीक आहे आणि नाही झालं तरी ठीक आहे. दुसरीकडे कमल हासन यांनी आपले लग्नाचे अनुभव सांगितले. कमल हासन यांनी दोन लग्नं केली. त्यांची पहिली पत्नी वाणी गणपती होती. तर कमल हासन यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव सारिका ठाकूर आहे. सारिका व कमल हासन यांना श्रुती हासन व अक्षरा हासन या दोन मुली आहेत. दोन्ही मुली अभिनेत्री असून अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये दोघींनी काम केलं आहे.
एका मुलाखतीत कमल हासन म्हणाले, “माझे खूप चांगले मित्र, खासदार ब्रिटास यांनी मला एकदा विचारलं की मी ब्राह्मण कुटुंबातील आहे. तरीही मी दोनदा लग्न का केले? आणि मी त्यांना विचारलं की लग्नाचा कौटुंबिक प्रतिष्ठेशी काय संबंध आहे.” ब्रिटास यांनी भगवान रामाची एकच पत्नी असल्याचे उदाहरण देत विचारलं तेव्हा कमल हासन यांनी नेमकं काय उत्तर दिलं ते जाणून घेऊयात.
कोणत्याही देवाची प्रार्थना करत नाही – कमल हासन
कमल हासन म्हणाले, “सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी कोणत्याही देवाची प्रार्थना करत नाही. मी प्रभू श्रीरामांच्या मार्गावर चालत नाही. कदाचित मी त्यांच्या वडिलांचे (दशरथ) यांचे अनुकरण करतो.” कमल हासन यांनी हिंदू पौराणिक कथांचा हवाला दिला, ज्यामध्ये राजा दशरथ यांना कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी या तीन बायका होत्या.
कमल हासन यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ते लवकरच ‘ठग लाइफ’ या चित्रपटात झळकणार आहेत. हा चित्रपट मणिरत्नम यांनी दिग्दर्शित केला आहे. ‘ठग लाइफ’ चित्रपट ५ जून २०२५ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.