शाहरूख खानने तिसऱ्यांदा पिता होण्यासाठी सरोगसी तंत्राचा वापर करताना लिंगनिदान चाचणी बंदी कायद्याचा भंग केल्याप्रकरणी त्याच्यावर पालिकेतर्फे कोणतीच कारवाई केली नसल्याने अ‍ॅड्. वर्षां देशपांडे यांनी अखेर गुरुवारी मुख्य महानगरदंडाधिकाऱ्यांकडे त्याविरोधात तक्रार दाखल केली. न्यायालयानेही तक्रारीची दखल घेत पालिकेसह शाहरूख, जसलोक रुग्णालय आणि राज्य सरकारला नोटीस बजावून उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.
शाहरूखवर याप्रकरणी आवश्यक ती कारवाई करण्याबाबत देशपांडे यांनी पालिकेला नोटीस बजावून १५ दिवसांची मुदत दिली होती. मात्र दिलेल्या मुदतीत पालिकेने कुठलीच कारवाई केलेली नाही. त्यामुळे देशपांडे यांनी अ‍ॅड्. उदय वारुंजीकर यांच्यामार्फत गुरुवारी मुख्य महानगरदंडाधिकाऱ्यांकडे पालिकेविरोधात खासगी तक्रार दाखल केली.