तमिळ सुपरस्टार सूर्याचा ‘जम भीम’ हा चित्रपट २ नोव्हेंबर रोजी अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. पण आता हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटातील एका सीनवर आक्षेप घेतला जात असून तो हटवण्याची मागणी सोशल मीडियावर केली जात आहे.

टी जे ज्ञानवेल यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘जय भीम’ चित्रपटात अभिनेते प्रकाश राज यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. चित्रपटातील एका सीनमध्ये त्यांनी हिंदी बोलणाऱ्या एका व्यक्तीच्या कानशिलात लगावली आहे. हा सीन सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही यूजरने या सीनवर आक्षेप घेतला असून चित्रपटातून हटवण्याची मागणी केली आहे.

एका यूजरने ‘आम्ही तामिळ चित्रपटांची वाट पाहात असतो. पण हा चित्रपट पाहिल्यानंतर मला वाईट वाटले. अशा सीन्सची खरच चित्रपटात गरज नाही. आशा आहे की निर्माते असे सीन्स हटवतील’ असे म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय आहे सीन?
‘जय भीम’ चित्रपटातील एका सीनमध्ये एक व्यक्ती हिंदी भाषेत प्रकाश राज यांच्याशी बोलत असतो. त्यावेळी प्रकाश राज त्या व्यक्तीच्या कानशिलात लगावतात. त्यानंतर ती व्यक्ती मला का मारले असा प्रश्न विचारताना दिसत आहे. त्यावर प्रकाश राज यांनी ‘तमिळमध्ये बोल’ असे म्हटले आहे. याच सीनवर सध्या आक्षेप घेतला जात आहे.