सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन आणि टीव्ही अभिनेत्री चारू असोपा मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं चर्चेत आहेत. लग्नानंतर ३ वर्षांतच दोघांनीही घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी वेगळं झाल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता या तुटलेल्या नात्यावर दोघांनीही नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मनमोकळेपणानं चर्चा केली. एवढंच नाही तर राजीव सेननं चारू आसोपावर गंभीर आरोप लावत घटस्फोटाचं कारण स्पष्ट केलं आहे.

चारू आसोपा आणि राजीव सेन यांनी ७ जून २०१९ रोजी लग्न केलं होतं. त्यानंतर १ नोव्हेंबर २०२१ ला त्यांच्या मुलीचा जन्म झाला. पण आता या दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. तुटलेलं नातं आणि घटस्फोट यावर बोलताना चारू म्हणाली, “सर्वांनाच माहीत आहे की आमच्या संसारात आता काहीच उरलेलं नाही. जेव्हा आमचं लग्न झालंय तेव्हापासून आज तीन वर्षं आमच्या दोघांमध्ये वाद आणि समस्या आहेत. मी त्याला अनेकदा संधी दिली. सुरुवातीला स्वतःसाठी आणि नंतर आमच्या बाळासाठी पण असं करता करता ३ वर्षं कधी संपली कळलीच नाहीत.”

चारू असोपा पुढे म्हणाली, “आमच्या नात्यात विश्वास राहिलेला नाही आणि आता मी त्याला सहन करू शकत नाहीये. मी त्याला एक साधी नोटीस पाठवली होती आणि सामंजस्यानं वेगळं होण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. जर आमच्या नात्यात आता काहीच उरलेलं नाही तर मला वाटतं आम्ही वेगळं झालेलं चांगलं. अशाप्रकारच्या तणावाच्या वातावरणात मला माझ्या मुलीला वाढवायचं नाही. रोजच्या भांडणांचा तिच्यावर परिणाम व्हावा असं मला अजिबात वाटत नाही.”

आणखी वाचा- महेश बाबू- नम्रता शिरोडकर यांनी घेतली Bill Gates यांची भेट, पोस्ट चर्चेत

एकीकडे चारू राजीववर आरोप करत असताना दुसरीकडे राजीवने देखील चारूवर गंभीर आरोप केले आहेत. राजीवनं चारूवर आरोप लावताना तिने पहिल्या लग्नाबाबत सर्व माहिती लपवल्याचं म्हटलं आहे. तो म्हणाला, “खरं तर तिचं गाव बिकानेरमधील लोक वगळता तिच्या पहिल्या लग्नाबाबत कोणालाही माहीत नव्हतं. हे गुपित आमच्यापासून लपवण्यात आलं. जेव्हा या गोष्टी समोर आल्या तेव्हा मला मोठा धक्का बसला. लग्नाला ३ वर्षं झाली आणि मला काहीच माहीत नव्हतं. मला माहीत आहे की हा तिचा भूतकाळ आहे. पण तिने मला विश्वासात घेऊन हे सगळं सांगायला हवं होतं. तिने सांगितलं असतं तर मी तेवढ्याच आदराने सगळं स्वीकारलं देखील असतं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजीव पुढे सांगतो, “बाबा झाल्यानंतर मी घरी राहत नाही ही तक्रार खरी नाहीये. तिच्यासाठी हॉलिडेज आणि व्हेकेशन खूप महत्त्वाचं आहे. जसं हे सगळं संपतं तसं ती माझ्या घरी नसण्याबद्दल बोलायला करायला सुरुवात करते. आजच्या जगात कोणावरच डोळे बंद करून विश्वास ठेवू नये. कारण जग बदलतंय आणि इथे सर्वांना फक्त पैशाची भाषा समजते.”