भारतात करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ७०० च्या पुढे गेली आहे. गुरुवारी देशभरात करोना व्हायरसमुळे सात जणांचा मृत्यू झाला. संपूर्ण देशात करोनामुळे आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. देशभरात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. घरातच राहा, घराबाहेर पडू नका असं आवाहन सरकारकडून, सेलिब्रिटींकडून करण्यात येत आहे. अभिनेत्री सुष्मिता सेननं भन्नाट ट्विट करत लोकांना घरीच बसण्याचं आवाहन केलं आहे.

सुष्मिताने ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये एका औषधाची बाटली पाहायला मिळतेय. COVID 19 चं औषध ‘घरीच राहा’ असं त्यावर लिहिलंय. हे औषध १०० टक्के कामी येतं असंही त्यावर म्हटलंय. गमतीशीर पद्धतीने सुष्मिताने लोकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे.

आणखी वाचा : करोनाच्या भीतीने मंदिरा बेदीला आला पॅनिक अटॅक

सध्या करोना विषाणूची लागण होण्यापासून स्वत:ला वाचवायचं असेल तर घरी बसण्याशिवाय पर्याय नाही, असं अनेकदा सांगण्यात येत आहे. तरीही लोक फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. अशा वेळी सेलिब्रिटींकडून विविध पद्धतीने चाहत्यांमध्ये जनजागृती निर्माण केली जात आहे. अक्षय कुमार, लता मंगेशकर, कार्तिक आर्यन यांसारख्या कलाकारांनी सोशल मीडियावरून जनतेला आवाहन केलं आहे.