स्वप्निल जोशी हा मराठी चित्रपटसृष्टीत ‘चॉकलेट बॉय’ प्रतिमा असलेला हिरो आहे. सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘पुणे मुंबई पुणे’ हा चित्रपट आणि त्यानंतर ‘एका लग्नाची गोष्ट’ या मालिकेच्या लोकप्रियतेनंतर स्वप्निलची लव्हरबॉय ही प्रतिमा चांगलीच अधोरेखित झाली. संजय जाधव दिग्दर्शित ‘दुनियादारी’ चित्रपटाच्या यशाने स्वप्निलच्या लोकप्रियतेवर शिक्कामोर्तबही के लं आहे. त्यामुळेच की काय, पण पहिल्यांदाच मराठी चित्रपट निर्मितीत उतरलेल्या हिंदीतील दोन दिग्गजांच्या प्रॉडक्शन बॅनरने हिरो म्हणून स्वप्निल जोशीलाच करारबद्ध केले आहे.

या वर्षांच्या सुरुवातीलाच बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान याने अखेर मराठी चित्रपट निर्मितीत उतरायचा निर्णय घेतला, अशी बातमी धडकली. एवढेच नाही तर त्याच्या पहिल्यावहिल्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन संजय जाधव करणार हेही नक्की झाले. आणि कलाकार म्हणून मुख्य भूमिकेतील स्वप्निल जोशीसह टीम ‘दुनियादारी’मधील अभिनेत्री सई ताम्हणकर, ऊर्मिला कानिटकर-कोठारे आणि अंकुश चौधरी यांचीही नावे निश्चित झाली असल्याचे समजते. आता या बातमीचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच ‘बाजीराव मस्तानी’च्या चित्रीकरणात व्यग्र असूनही दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी आपल्या चित्रपटनिर्मितीच्या कामांनाही वेगाने सुरुवात केली असल्याचे कळते. भन्साळींनी आपल्या बॅनरखाली इतर दिग्दर्शकांना संधी देत चित्रपटनिर्मितीही सुरू केली आहे. ‘रावडी राठोड’ आणि ‘गब्बर’च्या यशानंतर भन्साळींनी मराठी चित्रपट निर्मितीतही आपला तंबू ठोकायचा निर्णय जाहीर के ला आहे.

एवढय़ावरच थांबतील तर भन्साळी कुठले? त्यांनाही आपल्या मराठी चित्रपटासाठी नायक म्हणून स्वप्निल जोशीच हवा आहे. स्वप्निल हा मराठीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्यामुळे हिंदीतून मराठीत पदार्पण करणाऱ्या या दोन्ही दिग्गजांनी नायक म्हणून स्वप्निल जोशी या नावावरच शिक्कामोर्तब केल्याचे समजते. आता ठरल्यानुसार स्वप्निल पहिल्यांदा शाहरुखच्या चित्रपटाचे काम आणि त्यानंतर भन्साळींच्या चित्रपटाला सुरुवात करणार असल्याचे बोलले जाते.