मागील काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना रनौतच्या भारताला स्वातंत्र्य भीक म्हणून मिळाल्याच्या वादग्रस्त विधानावर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी देखील कंगनाच्या वक्तव्याला पाठिंबा देत भारताला मिळालेलं स्वातंत्र्य भीक म्हणूनच मिळाल्याचं म्हटलं. त्यामुळे आता त्यांच्यावरही टीकेची झोड उठलीय. बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करनेही विक्रम गोखले यांच्यावर निशाणा साधत “पद्म पुरस्कार येत आहे” अशी प्रतिक्रिया दिली.

अभिनेते विक्रम गोखले काय म्हणाले होते?

कंगना रनौत हिने स्वातंत्र्याबद्दल केलेल्या वक्तव्याला समर्थन देत विक्रम गोखले म्हणतात, “हे स्वातंत्र्य दिलं गेलं आहे. स्वातंत्र्य मिळावं यासाठी लढणारे योद्धे फासावर जात असताना अनेक मोठे लोक पाहत राहिले. ब्रिटीशांविरोधात उभे राहत असतानाही आपल्या लोकांना वाचवलं नाही.”

हेही वाचा : “कंगना रणौतला उपचारांची गरज, पद्मश्री पुरस्कार काढून घ्या”; महिला आयोगाच्या अध्यक्षांचे राष्ट्रपतींना पत्र

“भारत कधीही हिरवा होणार नाही याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. हा देश भगवाच राहिला पाहिजे.” असं विधानही त्यांनी जाहीरपणे केले. पंतप्रधान मोदींचं कौतुक करताना विक्रम गोखले म्हणाले, “एक व्यक्ती देशात ७० वर्षांपासून जी घाण साचली आहे ती साफ करत आहे, त्याला काही काळ का होईना मदत करता येत नाही?”

नेमकं प्रकरण काय?

गेल्या ८ नोव्हेंबरला कंगना रणौतला तिच्या चित्रपटातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते कंगनाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यानंतर कंगनाने ‘टाईम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने वादग्रस्त वक्तव्य केले. “देशाला १९४८ मध्ये मिळालेले स्वातंत्र्य हे स्वांतत्र्य नसून ती भीक होती. आपल्याला खरे स्वातंत्र्य हे २०१४ मध्ये मिळाले.”