महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल लागल्यानंतर आता दहावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी एसएससी बोर्डाच्या परीक्षांचा निकाल उशिरानं जाहीर करण्यात आला. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या लोकप्रिय मालिकेत बाळ शंभूराजे साकारणारा बालकलाकार दिवेश मेदगे यानेसुद्धा दहावीची परीक्षा दिली होती. त्याला निकाल लागला असून डॉ. अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
दिवेशला दहावीत ९०.६० टक्के गुण मिळाले आहेत. त्याचा फोटो पोस्ट करत अमोल कोल्हेंनी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत व त्याचं अभिनंदन केलं आहे.
“करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन जाहीर करण्यात आला. त्यामुळे भूगोलाचा पेपर आपल्याला रद्द करावा लागला. तसंच त्यामुळे आपल्याला सरासरी गुण द्यावे लागले,” अशी माहिती शिक्षण विभागाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली. यावर्षीही निकालात मुलींनीच बाजी मारली असून मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल ३ टक्क्यांनी अधिक असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.