South Actress Shares Intimate Scene Experience : मल्याळम, तमिळ, तेलुगू आणि कन्नड चित्रपटांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मोहिनी. ९० च्या दशकातील दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीशी परिचित असलेला प्रत्येकजण मोहिनीला नक्कीच ओळखत असेल. तिच्या भूमिकांची जादू आजही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. त्यामुळे तिचा शेवटचा चित्रपट प्रदर्शित होऊन १४ वर्षे झाली; तरी ती अजूनही लोकांच्या आठवणीत आहे.
यशाच्या शिखरावर असताना मोहिनीने आर. के. सेल्वमणी दिग्दर्शित ‘कनमणी’ (१९९४) या रोमँटिक ड्रामा चित्रपटात काम केलं होतं. या सिनेमात मोहिनीने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. पण तरी ‘कनमणी’ आणखी जास्त लक्षात राहण्याचं कारण, यातील इंटिमेंट सीन्स. या इंटिमेंट सीन्सबद्दल मोहिनीने नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे.
मोहिनीने सांगितले की, तिला त्या चित्रपटातील इंटिमेंट सीन करण्यासाठी जबरदस्ती केली गेली. सुरुवातीला तिने यासाठी नकार दिला होता. पण संपूर्ण चित्रपटाच्या निर्मितीवर परिणाम होऊ नये, म्हणून अखेर तिने हे सीन करणं मान्य केले. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, अवल विकटनला दिलेल्या मुलाखतीत तिने याबद्दल सांगितले, “दिग्दर्शक आर. के. सेल्वमणी यांनी हा स्विमिंग सूटमधील सीन प्लॅन केला होता. तेव्हा मला खूप अस्वस्थ वाटत होतं. मी रडलेही आणि तो सीन करण्यास नकार दिला, त्यामुळे अर्धा दिवस शूटिंग थांबवले गेले.”
यानंतर ती सांगते, “मी दिग्दर्शकांना समजावण्याचा प्रयत्न केला की, मला पोहायला येत नाही आणि महिला प्रशिक्षकांशिवाय मी ते कसू शिकू? पण ‘उदल तझुवा’ या सीनसाठी मला जबरदस्तीने ते सीन करायला लावले गेले असे मला वाटलं. मी अर्धा दिवस काम केले. त्यानंतर त्यांनी पुन्हा सांगितले की, तोच सीन पुन्हा उटीमध्ये शूट करायचा आहे, तेव्हा मी नकार दिला. त्यावर ते म्हणाले की, मग पुढे शूटिंग करता येणार नाही. तेव्हा मी म्हणाले, ‘मग तो ही तुमचा प्रॉब्लेम आहे, माझा नाही. तुम्ही आधीही मला जबरदस्तीने ते करायला लावलं होतं.”
यापुढे त्या सांगतात, “कधी कधी एखाद्याच्या इच्छेविरुद्ध गोष्टी घडतात आणि हा सीन अशाच एका प्रसंगाप्रमाणे होता. ‘कनमणी’मधील माझी भूमिका खूप सुंदर आणि आव्हानात्मक होती, पण या भूमिकेसाठी जितकं कौतुक होणं अपेक्षित होतं, तितकं कौतुक झालं नाही.”
दरम्यान, मोहिनीने आपल्या करिअरमध्ये शिवाजी गणेशन, नंदमुरी बालकृष्ण, चिरंजीवी, मोहनलाल, मामूट्टी, शिवराजकुमार, विजयकांत, विष्णुवर्धन, विक्रम, रविचंद्रन, सरथकुमार, मोहन बाबू आणि सुरेश गोपी यांसारख्या बड्या कलाकारांबरोबर काम केलं आहे. त्याशिवाय, तिने हिंदी चित्रपट ‘डान्सर’ (१९९१) मध्येही काम केलं आहे, यात तिने अक्षय कुमारबरोबर मुख्य भूमिका साकारली होती.